तासाभरात शहर स्वच्छ

By Admin | Updated: September 23, 2016 00:20 IST2016-09-23T00:20:55+5:302016-09-23T00:20:55+5:30

ऐरव्ही मोर्चे, सामूहिक कार्यक्रमानंतर परिसराची साफसफाई ही कुणीही आयोजक करीत नाही, हा आजतागायतचा अनुभव आहे.

Clean the city within an hour | तासाभरात शहर स्वच्छ

तासाभरात शहर स्वच्छ

मराठा विद्यार्थ्यांनी बजावले कर्तव्य : मोर्चाशी संबंधित रस्ते, स्थळांची साफसफाई
अमरावती: ऐरव्ही मोर्चे, सामूहिक कार्यक्रमानंतर परिसराची साफसफाई ही कुणीही आयोजक करीत नाही, हा आजतागायतचा अनुभव आहे. परंतु या बाबीला फाटा देत गुरुवारी मराठा समाजाच्या विद्यार्थी स्वंयसेवकांनी मुक मोर्चानंतर तासभरात शहर स्वच्छ करण्याची किमया केली आहे. शिस्तीसह स्वच्छतेचा संदेशही सकल मराठा समाजाने दिला आहे.
स्थानिक नेहरु मैदान ते गर्ल्स हायस्कुल चौक असा मुक मोर्चाचा गुरुवारी प्रवास होता. या मोर्चात जिल्ह्याभरातून मराठा समाज बांधव एकवटणार अशी सुसज्ज तयारी आयोजकांनी केली होती. त्यानुसार मुक मोर्चात लाखोंच्यावर मराठा समाजाने एकजुटीचे दर्शन घडविले. अमरावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने मोर्चात लोक सहभागी झाल्याचा अनुभव आला. मात्र ज्या मार्गाने, रस्त्याने आणि स्थळांवर मोर्चेकरांची ये- जा होती, ती सर्व मार्ग, स्थळे मोर्चाची सांगता होताच मराठा विद्यार्थ्यांनी तासभरात स्वच्छ करुन वेगळा आदर्श घडविला आहे. अमरावतीत मुक मोर्चाचे आयोजन ठरविताना मोर्चानंतर शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी मराठा समाजाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी अवघ्या तासभरात शहर स्वच्छ करुन कर्तव्य बजावले आहे.
नेहरु मैदान ते गर्ल्स हायस्कुल चौक दरम्यान हे अंतर ३.१ किमी आहे. मुख्य मार्ग पूर्णपणे स्वच्छ करताना शहरातील विविध पार्किंग स्थळे, मोर्चा स्थिरावल्याचे ठिकाण, बाहेर गावाहून येणारे मोर्चेकऱ्यांचे मार्ग देखील स्वच्छ करण्यात आले आहे. शहर स्वच्छतेसाठी विद्यार्थी स्वंयसेवक नेमले असताना मोर्चातील मराठा बांधवांनी सुद्धा स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. स्वच्छता करताना केरकचरा, पाणी पाऊच आदी साहित्य उचलण्यासाठी तिवसा तालुक्यातून ट्रॅक्टर ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली. मोर्चा संपताच विद्यार्थ्यांनी स्वच्छतेस प्रारंभ केला. महापालिका यंत्रणा शहर स्वच्छ करणार अशी अपेक्षा होती. मात्र मोर्चानंतर तासभरात शहर स्वच्छ करुन विद्यार्थ्यांनी कर्तव्य बजावल्याचे बघून भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, माजी महापौर विलास इंगोले, नगरसेवक राजेंद्र महल्ले हे देखील अवाक् झाले, हे विशेष.

Web Title: Clean the city within an hour