स्वच्छता देयकांमधील साखळी ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 00:02 IST2017-03-04T00:02:38+5:302017-03-04T00:02:38+5:30
दैनंदिन सफाईची देयके प्रदान करताना उफाळलेली टक्केवारीच्या बजबजपुरीला आयुक्त हेमंत पवार यांनी लगाम घातला आहे.

स्वच्छता देयकांमधील साखळी ‘ब्रेक’
आयुक्तांचा घणाघाती निर्णय : प्रशासकीय वर्तुळात खळबळ
अमरावती : दैनंदिन सफाईची देयके प्रदान करताना उफाळलेली टक्केवारीच्या बजबजपुरीला आयुक्त हेमंत पवार यांनी लगाम घातला आहे. महापालिकेत अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या साखळीला पवारांनी ब्रेक दिला आहे. यातील पाच जणांना डच्चू देण्यात आला आहे. पवारांच्या या घणाघाती निर्णयाने आरोग्य आणि स्वच्छता विभागात खळबळ माजली असून भ्रष्ट कर्मचारी अधिकाऱ्यांचे चेहरे पडले आहेत.
दैनंदिन स्वच्छतेची देयके सादर करताना त्यात अधिकारी कर्मचाऱ्यांची बरीच मोठी साखळी असल्याने ही देयके प्रदान करण्यासाठी मोठा विलंब होत असल्याचे निरीक्षण नोंदवून आयुक्तांनी या देयकांचा प्रवासाचा मार्ग नव्याने निश्चित करून दिला आहे. २ मार्चला काढलेल्या या कार्यालयीन परिपत्रकान्वये आयुक्तांनी दैनंदिन स्वच्छतेच्या देयकांचा प्रवास संबंधित स्वच्छता निरीक्षक, सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त किंवा आयुक्त असा आखून दिला आहे. अर्थात या नव्या मार्गातून झोन स्तरावरील २ कर्मचारी व मुख्य कार्यालयातील लिपिक, स्वास्थ्य अधीक्षक अरुण तिजारे व स्वच्छता अधिकारी अजय जाधव अशी पाच कर्मचारी, अधिकारी वगळण्यात आली आहेत. आता तिजारे किंवा जाधव किंवा शाम चावरेंकडे स्वच्छता देयकांची फाईल जाणार नाही. आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांनी, अंगिकारलेली टक्केवारीचे बजबजपुरी आयुक्तांच्या नव्या घणाघाती निर्णयाने संपुष्टात येईल, अशी शक्यता आहे. प्रत्येक टेबलवर कमी अधिक प्रमाणात देण्यात येणारी बिदागीला आयुक्तांनी लगाम घातल्याने भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे चेहरे पडले आहेत.
असे आहेत नवे आदेश
दैनंदिन स्वच्छतेची देयके सादर करताना त्यात अधिकारी - कर्मचाऱ्यांची बरीच मोठी साखळी असल्याने ही देयके प्रदान करण्यासाठी अवाजवी विलंब होत असल्याचे आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. याचा विपरित परिणाम दैनंदिन स्वच्छतेच्या कामावर पडतो. या बाबी टाळण्यासाठी दैनंदिन स्वच्छतेची देयके आता नव्या मार्गाने सादर होतील.
असा राहील फाईलचा प्रवास
टेबल कमी करुन आरोग्य विभागातील साखळी संपुष्टात आणल्या गेली आहे. आता संबंधित स्वच्छता निरीक्षक देयक तयार करतील व ते सहायक आयुक्तांना सादर करतील. सहायक आयुक्त हे सरळ वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्याकडे देयके पाठवतील. ‘एमओएच’ नैताम या उपायुक्त (सामान्य) मार्फत सदर देयक अतिरिक्त आयुक्त-आयुक्तांना सादर करतील. या नव्या साखळीने झोन स्तरावरील दोन आणि मुख्य कार्यालयातील तिघे बाद झाले आहेत. या निर्णयामुळे फोफावलेल्या टक्केवारीला ब्रेक बसणार आहे.
लेटलतिफी नकोच
स्वच्छता निरीक्षक, सहायक आयुक्त, एमओएच, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त किंवा आयुक्त अशा प्रकारे संचिका हाताळताना प्रत्येक स्तरावर एक दिवसापेक्षा अधिक कालावधी लागणार नाही, याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. एखादा अधिकारी त्या दिवशी रजेवर असल्यास तो अधिकारी रजेवर आहे, अशी नोंद घेऊन ती त्याच दिवशी पुढील अधिकाऱ्याकडे सादर करावी. ती संचिका त्या स्तरावर प्रलंबित ठेवू नये, असे आदेश आयुक्तांनी पारित केले आहेत.
दैनंदिन स्वच्छतेची देयके सादर करतानाची साखळी ब्रेक करण्यात आली. या साखळीतून पाचजण बाद करण्यात आले.
- हेमंत पवार,
आयुक्त, महापालिका