सीपींनी घेतला शिकवणी वर्गशिक्षकांचा क्लास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:23 IST2017-12-15T23:22:42+5:302017-12-15T23:23:42+5:30
अलीकडे होत असलेली गुन्ह्यांची नोंद व सोशल मीडियाचा धुडगूस पाहता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शिकवणी वर्गाच्या शिक्षकांचा क्लास घेतला.

सीपींनी घेतला शिकवणी वर्गशिक्षकांचा क्लास
आॅनलाईन लोकमत
अमरावती : अलीकडे होत असलेली गुन्ह्यांची नोंद व सोशल मीडियाचा धुडगूस पाहता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शिकवणी वर्गाच्या शिक्षकांचा क्लास घेतला. पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी संबोधित केले. आठवीपासूनचे विद्यार्थी अधिकाधिक काळ शिकवणी वर्गातच घालवतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपसूकच शिकवणी वर्गाच्या शिक्षकांवर येते. या विषयात पोलीस आयुक्तालयाकडून जारी केलेल्या सूचनांचे पालन शिकवणी वर्गाकडून केले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, चिन्मय पंडित, सहायक पोलीस आयुक्त पी.डी. डोंगरदिवे यांच्यासह पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, नीलिमा आरज, अनिल कुरुळकर, उमेश पाटील, दत्ता गावडे यांच्यासह खासगी शिकवणी वर्ग घेणारे शंभरावर शिक्षक उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांनी सूचना देऊन त्यांचे पालन करण्याचे निर्देश शिक्षकांना दिले. यावेळी शिक्षकांनीही त्यांच्या काही समस्या पोलिस आयुक्त समक्ष मांडल्या. रात्री ९ वाजता वर्ग सुटल्यानंतर पालकांनीच त्यांच्या मुलामुलींना घेऊन जाण्याचा मुद्दा शिक्षकांनी माडला. या मुद्द्यावर पोलीस आयुक्तांनी सहमती दर्शविली आणि तशा सूचना पालकांना देण्यात याव्यात, असे सांगितले.
सूचनांचे पालन न झाल्यास नोटीस बजावणार
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे दृष्टीने पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे पालन शिकवणी वर्गाच्या शिक्षकांना करणे अनिवार्य राहणार आहे. या सूचनांचे पालन न झाल्यास पोलिसांकडून शिक्षकांना नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध कलम १८८ अन्वये कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे.
या आहेत सूचना
मुलांची हजेरी घ्या. विद्यार्थी गैरहजर असल्यास त्यांच्या पालकांना कळवा. सुरक्षा रक्षकाची नेमणूक करा. शिकवणी वर्गातील मुलांशिवाय बाहेरील कोणतीही व्यक्ती परिसरात फिरणार नाही, याची दक्षता घ्या. मुले गैरहजर असतील, तर त्यांच्या पालकांच्या व्हॉट्स अॅपवर संदेश पाठवा. वर्गातील मुलामुलींना बाहेरील व्यक्तीसोबत सोडू नका. शिकवणी वर्ग परिसरात बोर्ड लावा. मुला-मुलींना ओळखपत्र द्या. सीसीटीव्ही लावा. शिकवणी वर्गाच्या परिसरात सुरक्षित पार्किंगची व्यवस्था करा.
पोलीस देतील भेट
शहरात १०३ शिकवणी वर्गांची पोलीस दप्तरी नोंद आहे. या शिकवणी वर्गांना पोलीस कर्मचारी भेट देऊन तेथील घडामोडींचा आढावा घेतील. काही संशयित किंवा टवाळखोर तरुण आढळले, तर त्यांची चौकशी करून त्यांना ताब्यात सुद्धा घेतील. शिकवणी वर्ग परिसरात जर बाहेरील तरुण टवाळखोरपणा करीत असतील, तर त्या तरुणांच्या दुचाकीचे क्रमांक घ्यावेत व मोबाइलमध्ये चित्रीकरण करावे. ती माहिती प्राप्त होताच पुढील कारवाई पोलीस करतील, अशा सूचनाही पोलीस आयुक्तांनी शिक्षकांना दिल्या.