दापोरी प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:17 IST2021-02-26T04:17:18+5:302021-02-26T04:17:18+5:30

पान २ ची लिड शाळा झाली १४२ वर्षांची, जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ अजय पाटील मोर्शी : ...

Classrooms at Dapori Primary School are blocked | दापोरी प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांना तडे

दापोरी प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांना तडे

पान २ ची लिड

शाळा झाली १४२ वर्षांची, जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

अजय पाटील

मोर्शी : तालुक्यात दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणारे विद्यार्थी मुक्त मनाने जातात. परंतु शाळेची जीर्ण झालेली इमारत पाहून शिक्षक पालकांसह त्यांच्याही निरागस मनाची घालमेल होते. परंतु जिल्हा परिषदेला त्याचे काय? शाळेच्या प्रवेशद्वारातूनच विद्यार्थी जणू काही यमाच्या दारातून सरस्वतीचे दर्शन घेत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहेत. येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा प्रशासनाच्या उदासीन धोरणाचे बोलके उदाहरण आहे.

दापोरी येथे १८७९ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेने १४२ वर्षे पूर्ण केली आहेत. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत सात शिक्षक असून मुख्याध्यापकपद रिक्त आहे. तूर्तास १९१ विद्यार्थीसंख्या आहे. शाळेची इमारत शिकस्त झाली असून, जागोजागी तिचे प्लास्टर उखडलेले आहे. कवेलू पडत आहेत. इमारतीच्या भिंतीला तडे गेले आहेत. अशा इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण घेणे चालू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. शाळेच्या शिकस्त वर्गखोल्या अद्यापही पाडण्यात आलेल्या नाही. या इमारती विद्यार्थी, शिक्षकांसाठी धोकादायक ठरू लागल्या आहेत. दापोरी येथील शाळेमधील शिकस्त वर्गखोल्या कोसळण्याच्या अवस्थेत आल्या आहे.

दुरुस्तीचा प्रस्ताव धूळखात

दापोरी शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापकांनी याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवून दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला. पंचायत समितीने याकरिता १८ जून २०१७ रोजी दापोरी शाळेची महत्तम दुरुस्ती करणे व शिकस्त वर्गखोल्या पाडून नवीन वर्गखोल्या बांधण्याची मागणी करणारा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविला होता. मुख्याध्यापकांनी वारंवार पाठपुरावा केला. परंतु त्यांची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. या गंभीर बाबीमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक नेहमीच दडपणाखाली असतात. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे प्रशासन मोठा अपघात होऊन विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची वाट पाहतेय का, असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे.

प्रस्ताव अडकला कुठे?

दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिकस्त वर्गखोल्या पाडून नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्याकरिता जिल्हा परिषदकडे ४ वर्षांच्या काळामध्ये अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला. गट शिक्षणाधिकारी व बांधकाम विभाग अभियंतांनी शाळेच्या वर्गखोल्या शिकस्त असल्याचा अहवाल पाठवूनही त्याची दखल कुणीच घेताना दिसत नाही. नवीन वर्गखोल्या बांधकामाकरिता जागेची कुठलीही अडचण नाही. मात्र, शासनाकडून निधीच उपलब्ध होत नसल्याचा आरोप दापोरी ग्रामपंचायतचे सदस्य रुपेश वाळके यांनी केला आहे.

---------------------------------

Web Title: Classrooms at Dapori Primary School are blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.