दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार कलेसाठी सवलतीचे गुण
By Admin | Updated: January 10, 2017 00:30 IST2017-01-10T00:30:26+5:302017-01-10T00:30:26+5:30
पुढील वर्षीच्या शैक्षणिक सत्रात शास्त्रीय कला व चित्रकला या विषयात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीसाठी सवलतीचे १५ गुण देण्यात येणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार कलेसाठी सवलतीचे गुण
विद्यार्थ्यांना दिलासा : पुढील शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणी
अमरावती : पुढील वर्षीच्या शैक्षणिक सत्रात शास्त्रीय कला व चित्रकला या विषयात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीसाठी सवलतीचे १५ गुण देण्यात येणार आहे. २०१८ मध्ये दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
शास्त्रीय नृत्य, गायन व वादन यामध्ये ज्या विद्यार्थ्याने कमीत कमी ५ वर्षांचे शिक्षण मान्यताप्राप्त संस्थेतून घेतले असावे व त्याने मान्यताप्राप्त संस्थाची ३ परीक्षा उत्तीर्ण केली असल्यास १० गुण व ५ परीक्षा उत्तीर्ण केली असल्यास १५ गुण देण्यात येणार आहे. जे विद्यार्थी शास्त्रीय नृत्य, गायन व वादन या प्रकारात राष्ट्रीय, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती प्राप्त करतील अशांना वाढीव २५ गुण दिले जाईल. ज्या संस्थांची नोंदणी सांस्कृतिक कार्य विभागाकडे असेल त्या संस्थेचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले असल्यास विद्यार्थी ज्या शाळेत इयत्ता १० वी शिकत आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत ते तपासून प्रमाणित करण्यात येईल.विद्यार्थ्याने उत्तीर्ण केलेल्या परीक्षांप्रमाणे त्याला अतिरिक्त गुण देण्याची व राज्य मंडळाकडे कळविण्याची जबाबदारी संबंधित शाळा मुख्याध्यापकाची राहील. कला क्षेत्रातील शास्त्रीय गायन, नृत्य व वादन यापैकी कोणत्या प्रकारासाठी अतिरिक्त गुण दिले ते राज्य मंडळातर्फे संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत नमूद केले जाईल.
लोककलेसाठीही मिळणार सवलतीचे गुण
इयत्ता ८, ९ व १० वी या शैक्षणिक वर्षात राज्य शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या बालनाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यास अनुक्रमे १५ , १० व ५ अतिरिक्त गुण देण्यात् येणार आहे. तसेच इयत्ता १ ली पासून शालेय स्तरावर कोणत्याही वर्षी राष्ट्रीय स्तरावरील अभिनय पुरस्कार प्राप्त होणाऱ्या बाल कलाकारास १० अतिरिक्त गुण तसेच राज्य स्तरावर प्रस्तुत पुरस्कार प्राप्त होणाऱ्या बाल कलाकारास ५ अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे.
इंटरमिजिएट ग्रेड ‘ए’ साठी १५ गुण
इंटरमिजिएट ड्रार्इंग ग्रेड परीक्षेतील ग्रेड ‘ए’ प्राप्त विद्यार्थ्यांना १५ गुण, ग्रेड ‘बी’ प्राप्त विद्यार्थ्यांना १० गुण व ग्रेड ‘सी’ प्राप्त विद्यार्थ्यांना ५ गुण देण्यात येणार आहेत. कला क्षेत्रासाठी असणाऱ्या दोन टक्के आरक्षणामध्ये शास्त्रीय गायन, नृत्य व वादन या कला प्रकारात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यासोबत चित्रकलेची इंटरमिजिएट ड्रॉर्इंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील सत्रापासून समावेश करण्यात येणार आहे.