दहावीतील वर्गमित्रांनी कोरोनात जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:42+5:302021-06-02T04:11:42+5:30
परतवाडा : दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय दोन वर्गमित्रांनी एकत्र येऊन खाऊच्या पैशातून कोविड रुग्णालयाला साहित्य भेट देत सामाजिक बांधिलकी ...

दहावीतील वर्गमित्रांनी कोरोनात जपली सामाजिक बांधिलकी
परतवाडा : दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय दोन वर्गमित्रांनी एकत्र येऊन खाऊच्या पैशातून कोविड रुग्णालयाला साहित्य भेट देत सामाजिक बांधिलकी जपली. समर्थ विजय खंडेलवाल आणि स्वयम् ललित राठी हे ते दोन वर्गमित्र आहेत. संस्कार इंटरनॅशनल स्कूल परतवाडा येथील इयत्ता दहावीचे ते विद्यार्थी आहेत. कोरोना महामारीच्या अनुषंगाने दगावलेले आणि संक्रमित होत असलेले रुग्ण बघून शहरातील कोविड रुग्णालयांकडे त्यांची नजर खिळली.
अचलपूर कुटीर रुग्णालयातील कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जाकीर यांची त्यांनी भेट घेतली. कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारादरम्यान लागणाऱ्या साहित्याची त्यांच्याकडून माहिती घेतली. कल्याण मंडपम येथील कोविड सेंटरलाही ते पोहचलेत. कोरोना महामारीत आपणही सामाजिक बांधिलकी जपावी, या हेतूने ते प्रेरित झालेत. त्यांनी खाऊचे पैसे गोळा केले, हे पैसे कमी पडतील म्हणून त्यांनी नातेवाईकांसह ओळखीच्या लोकांकडे अर्थसहाय्य मागितले. त्या पैशातून त्यांनी आवश्यक वैद्यकीय साहित्य विकत घेतले.
स्वतः कोविड रुग्णालयात जाऊन त्यांनी बीपी याप्रेटर्स, ऑक्सिमीटर, नेब्युलायझर, ऑक्सिजन मास्क, पीपीई किट्स व अन्य साहित्य तेथील यंत्रणेच्या स्वाधीन केले. दहावीतील या दोन वर्गमित्रांनी जपलेली ही सामाजिक बांधिलकी शब्दांपलीकडची असून इतरांना प्रेरक ठरली आहे.
दि 01/06/21.साहित्यासह फोटो