इयत्ता १२ वीची पुरवणी परीक्षा ९ जुलैपासून
By Admin | Updated: May 26, 2016 01:17 IST2016-05-26T01:17:41+5:302016-05-26T01:17:41+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातंर्गत उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) ची परीक्षा ९ जुलैपासून घेतली जाणार आहे.

इयत्ता १२ वीची पुरवणी परीक्षा ९ जुलैपासून
शिक्षण मंडळाचा निर्णय : संजय यादगिरे यांची माहिती
अमरावती : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातंर्गत उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) ची परीक्षा ९ जुलैपासून घेतली जाणार आहे. त्यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना ४३ दिवसांनंतर पुन्हा परीक्षेला सामोरे जावे तर लागणार आहेच; मात्र शैक्षणिक वर्षही वाया जाणार नाही.
इयत्ता १० आणि १२ वीची परीक्षा सोबत सुरु होणार असल्याचे शिक्षण मंडळाचे सचिव संजय यादगिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
यावर्षी इयत्ता १२ वीत अमरावती जिल्ह्यातील ३८१ कनिष्ठ महाविद्यालयांतून ३५२३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५१७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ३०२६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे ९ जुलैपासून सुरू होणाऱ्या १२ वीच्या पुरवणी परीक्षेकरिता ४९१४ एवढ्या विद्यार्थ्यांना तयारी करावी लागणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज जून महिन्यातच महाविद्यालयात सादर क रावा लागणार आहे. गतवर्षी इयत्ता १० वीचा निकाल लागल्यानंतर नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, यासाठी लगेच परीक्षेचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इयत्ता १० वीची परीक्षा घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक सत्रात पुढील वर्गात प्रवेश घेता आला. आता हाच प्रयोग इयत्ता १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आला असून ९ जुलैपासून परीक्षा सुरू होणार आहे. जुलै महिन्यात परीक्षा आटोपून आॅगस्टमध्ये निकाल लावण्याची तयारी शिक्षण मंडळाने दर्शविली आहे. परीक्षेनंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता निकाल लागताच प्रवेश मिळणार असल्याने हा निर्णय विद्यार्थ्यासाठी लाभदायक ठरणारा असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)