दावेदारांची भाऊगर्दी, ११८ नामांकन
By Admin | Updated: October 7, 2015 01:35 IST2015-10-07T01:35:33+5:302015-10-07T01:35:33+5:30
७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या शिक्षक बँकेच्या निवडणूक रणधुमाळीने वेग घेतला आहे. मंगळवारपर्यंत ११८ इच्छुकांनी नामांकन दाखल केल्याने ...

दावेदारांची भाऊगर्दी, ११८ नामांकन
अमरावती : ७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या शिक्षक बँकेच्या निवडणूक रणधुमाळीने वेग घेतला आहे. मंगळवारपर्यंत ११८ इच्छुकांनी नामांकन दाखल केल्याने २१ संचालक पदांसाठी उमेदवारांची भाऊगर्दी राहणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे.
या निवडणुकीची प्रक्रिया ३ आॅक्टोबरपासून सुरू झाली असून ७ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. यावर्षी प्रथमच ही निवडणूक विभागीय स्तरावर होत असून प्रत्येक मतदाराला २१ शिक्के मारावे लागणार आहेत. आतापर्यंत या निवडणुकीसाठी २२० पेक्षा अधिक नामांकनाची उचल झाली असून प्रमुख चार पॅनेलच्या उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. चार पॅनेलसह काही अपक्षही निवडणूक रिंगणात उतरले असून प्रत्येक जण बँकेच्या विकासाचा दावा करीत आहे.
मंगळवारी कांतानगरस्थित उपनिबंधक कार्यालयात उमेदवारांसह त्यांच्या शेकडो समर्थकांनी गर्दी केल्याने या परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. या गर्दीत शिक्षक आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.
शिक्षकांची जिव्हाळ्याची बँक असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत प्रथमच जि. प. कर्मचारी संवर्गातून एक प्रतिनिधी निवडला जाणार असल्याने जिल्हा परिषदेचे कर्मचारीसुद्धा राजकारणात रंगले आहेत. प्रत्यक्ष भेटीगाठीनंतर उमेदवारांचा भर असून अनेक उमेदवारांनी प्रचाराचा पहिला टप्पा पार केला आहे. उल्लेखनीय म्हणजे निव्वळ कागदावर असलेल्या संघटनासुद्धा उपद्रवमूल्य दाखविण्यासाठी पत्रकबाजी करीत आहे. अनेक पॅनेलमधील समर्थित संघटनांचे नाव पाहिले असता कर्मचारी व शिक्षकांच्या एवढ्या संघटना खरेच आहेत का, हा प्रश्न उपस्थित होतो.