जेलमधून वाहणाऱ्या सांडपाण्याने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:19 IST2019-03-10T21:19:06+5:302019-03-10T21:19:30+5:30
जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सांडपाणी चपराशीपुरा परिसरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. मात्र, नाल्याची अनेक महिन्यांपासून सफाई झालेली नसल्याने ते पाणी यथेच्छ साचले आहे. त्या पाण्यावर डासांचा थर राहत असल्याने परिसरातील नागरिकांना मलेरियाचा आजार होण्याची शक्यता बळावली आहे.

जेलमधून वाहणाऱ्या सांडपाण्याने नागरिक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सांडपाणी चपराशीपुरा परिसरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. मात्र, नाल्याची अनेक महिन्यांपासून सफाई झालेली नसल्याने ते पाणी यथेच्छ साचले आहे. त्या पाण्यावर डासांचा थर राहत असल्याने परिसरातील नागरिकांना मलेरियाचा आजार होण्याची शक्यता बळावली आहे.
चपराशीपुरा परिसरात बहुतांश नागरिक दाटीवाटीने वास्तव्य करीत असल्याने तेथे मोकळी हवा दुर्लभच. त्यातही नाल्यांची नियमित सफाई होत नसल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढणे साहजिकच. अमरावती मध्यवर्ती कारागृहात शेकडो बंद्यांसह कर्मचारी राहतात. तेथील सांडपाणी गजानननगरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. परंतु कारागृहाच्या जागेतील ती नाली गाळाने बुजली असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नालीऐवजी खुल्या जागेतून पाणी वाहत आहे. पुढे गजानननगरातील नाल्यात जात होते. मात्र, अनेक दिवसांपासून तो नाला कचऱ्याने पूर्णत: तुंबल्यामुळे सांडपाणी नाल्याच्या वरच्या भागात जमा होत आहे. परिणामी साचलेल्या सांडपाण्यावर डासांचा थर कायम राहत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महापालिकेने लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी 'लोकमत'शी बोलताना दिल्यात.
दमट वातावरणाचा परिणाम
चपराशीपुरा प्रभागात सामान्य नागरिकांचे वास्तव्य असल्याने तोकड्या जागेत शक्य तशा पद्धतीने घरे बांधून नागरिक वास्तव्य करतात. त्यामुळे दमट वातावरणात मुंबईप्रमाणे जीवन जगण्याचा अनुभव येथील नागरिक घेत आहेत. त्यातही सफाईअभावी दुर्गंधीचा सामना करावे लागत असल्याने आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.
गत वर्षात डेंग्यूनेचा कहर
आॅगस्ट ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान शहरात डेंग्यू आजाराने कहरच केला. याबाबत 'लोकमत'ने मालिकाच चालविली. याची दखल घेतल्याने काही भागातील समस्या निवारण्यात आली. या भागात सर्वाधिक नागरिक डेंग्यूने आजारी होते. ही स्थिती अस्वच्छतेमुळे उदभवल्यानंतरही येथील अद्याप स्थिती सुधारलेली नाही