शहरात दुपट्ट्यांची 'क्रेझ'
By Admin | Updated: July 4, 2016 00:08 IST2016-07-04T00:08:42+5:302016-07-04T00:08:42+5:30
दिवसरात्र दुपट्टे बांधून फिरणाऱ्या तरुणाईमुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही वर्षांपासून

शहरात दुपट्ट्यांची 'क्रेझ'
गुन्हेगारी फोफावणार ? : पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
अमरावती : दिवसरात्र दुपट्टे बांधून फिरणाऱ्या तरुणाईमुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही वर्षांपासून शहरात दुपट्ट्याची 'के्रझ'च वाढली आहे. बेधूंद तरुणाई दुपट्टे बांधून फिरत असल्यामुळे त्याचा गैरफायदा गुन्हेगार घेऊ शकतात. मात्र, याकडे पोलीस विभाग दुर्लक्ष करीत आहे.
उन्हापासून किंवा वाहनाच्या प्रदूषणापासून चेहऱ्याची सुरक्षा व्हावी, या उद्देशाने तरुणाई दुपटे बांधत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, आता केवळ दुपट्टे बांधण्याची के्रझच आली आहे. उन्हाळा संपून काही दिवस ओलांडून गेले आहेत. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. त्यातच आता पावसाळा लागला असून आल्हाददायक वातावरण असल्याचे आढळून येते. मात्र, तरीसुद्धा दुपट्टे बांधणाऱ्याची के्रझ कमी झाली नसल्याचे दिसून येते. दिवसभर फिरणारी तरुणाई सायंकाळनंतरही दुपट्टे बांधताना आढळून येत आहे. शहरात सर्रासपणे तरुणाई दुपट्टे बांधत असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन गुन्हेगार प्रवृत्तीचे नागरिक गुन्हे करू शकतात. घराबाहेर निघणातानाच तरुणाई चेहरे दुपट्टे बांधतात. सुसाट वेगाने वाहने चालवितात. हा सर्व प्रकार पोलिसांच्या डोळ्यांदेखत सुरू असतो. मात्र, त्यांना आवर घालणाची जबाबदारी सांभाळणारे पोलीस बघ्यांची भूमिका घेतात. सद्यस्थितीत दुपट्टे बांधणाऱ्यांमध्ये मुलीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून येते. मात्र, आता दुपट्टे बांधण्यात मुलांचेही प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक चौक, रेल्वे स्थानक, बसस्थानक व अन्य अनेक सार्वजनिक ठिकाणी दुपट्टे बांधून उभी असणारी तरुणाई पोलिसांच्या दृष्टीस पडते. मात्र, दुपट्टा आड कोण लपले आहेत, याची शहानिशासुध्दा पोलीस करीत नाही. या दुपट्टयाआड गुन्हेगार आपली कामगिरी बजावू शकतो. यांची थोडीशीही भनक पोलिसांना नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी हे पाऊल उचलणे आता गरजेचे झाले आहे. या दुपट्याआड गुन्हेगारी लपून राहू शकते, अवैध प्रकार होऊ शकते, गुन्हेगार एटीएममध्ये जावून पैसे काढू शकते, असे ना ना प्रकारचे गुन्हे घडण्यास चालना मिळू शकते. (प्रतिनिधी)
प्रेमीयुगुलांमध्ये
वाढते फॅड
तरुण-तरुणी घरून निघताना दुपट्टे बांधूनच निघतात. शहरात एका ठिकाणी एकत्रीत येऊन प्रेमीयुगुल बिनधास्त फिरताना दिसतात. दुपट्टे बांधून प्रेमीयुगुल पळून जाण्यातही यशस्वी होतात. दुपट्टे बांधण्याच्या के्रझमधून तरुणी मुलींची छेडखाणीसुद्धा होऊ शकते. मात्र, दुपट्टे बांधणाऱ्या गुन्हेगारीची ओळख पटविणार तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात मुली-महिलांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने दुपट्टा बांधणे हा प्रकार काही प्रमाणात ठिक आहे. मात्र आवश्यकता नसताना दुपट्टे बांधण्याचा प्रकार योग्य नाही. शहरात असे होत असेल तर दुपट्टा बांधणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले जाईल.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.