वरुड शहर कडकडीत बंद
By Admin | Updated: September 22, 2014 23:12 IST2014-09-22T23:12:02+5:302014-09-22T23:12:02+5:30
येथील नितीन बैस या युवकाचे अपहरण करुन त्याची क्रूर हत्या केल्याच्या निषेधार्थ सोमवारी वरुड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली.

वरुड शहर कडकडीत बंद
वरुड : येथील नितीन बैस या युवकाचे अपहरण करुन त्याची क्रूर हत्या केल्याच्या निषेधार्थ सोमवारी वरुड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. शाळा-महाविद्यालयांना यातून वगळण्यात आले होते.
येथील नितीन बैस (ठाकूर) याचे १७ सप्टेंबर रोजी अपहरण करुन हत्या करण्यात आली. मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्यात आला. या क्रूर हत्येप्रकरणी भाजपचे वरुड तालुकाध्यक्ष योगेश घारड, राम दुर्गे, राम बिजवे, दिनेश बारस्कर आणि नितीनचा कारचालक रमाकांत ब्राम्हणे (सर्व रा.वरुड) या पाच आरोपींना अटक करण्यात आली.
नितीन बैस हत्येप्रकरणी आरोपींना अटक केल्यानंतर रविवारी रात्रीच पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी गर्दी केली होती. त्याचवेळी सोमवारी वरुड शहर बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आज सोमवारी सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी बाजारपेठेतील प्रतिष्ठाने उघडलीच नाही. काही व्यापाऱ्यांनी उघडलेली आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद केले. या बंदतून शाळा-महाविद्यालयांना वगळण्यात आले होते. येथील बाजारपेठ परिसरात दुकाने बंद असल्याने शुकशुकाट दिसून आला. परंतु काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला नागरिक घोळक्याने चर्चा करताना दिसून आले. दुपारनंतर बाजारपेठ काही प्रमाणात सुरु झाली होती. हत्येनंतर पोलिसांनी येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती. वरुडसह बेनोडा, शेंदूरजना घाटचे पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. तसेच अमरावतीहून ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक वरुडमध्ये तळ ठोकून आहे. चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.