शहरात वाळू साठा कायम
By Admin | Updated: June 22, 2015 00:13 IST2015-06-22T00:13:38+5:302015-06-22T00:13:38+5:30
वाळुसाठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची शासन तयारी करीत असताना शहरात मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा....

शहरात वाळू साठा कायम
प्रशासनाची चुप्पी : चढ्या दरात वाळूची विक्री
अमरावती : वाळुसाठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची शासन तयारी करीत असताना शहरात मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा असूनदेखील त्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष चालविले आहे. एवढेच नव्हे, तर वाळुसाठा करणाऱ्यांनी चक्क शासकीय जागेचा वापर केल्याचे वास्तव समोर आले आहे.
वाळू तस्करांवर कठोर कारवाईसाठी राज्य शासन सरसावले आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे त्याकरिता आग्रही आहेत. वाळुमाफियांवर लगाम लावण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. नद्या, समुद्र, खाडीतून मोठ्या प्रमाणात वाळुची चोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वाळू चोरी रोखणे हे महसूल विभागाच्या हाताबाहेरचे काम झाले आहे. त्यामुळे शासनाने आता वाळुमाफियांवर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्याचा (एमपीडीए) चा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याचीे मुहूर्तमेढ येत्या मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, शहरात ठिकठिकाणी वाळुसाठा कायम असताना याकडे स्थानिक महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. साठा केलेली वाळू चढ्या दरात विकून बांधकामधारकांची लूट केली जात आहे. शहराच्या लोकवस्तीत साठा केलेली वाळू ही वर्धा, बेंबळा नदीतून किंवा नजीकच्या नाल्यातून उपसा करुन आणल्याची माहिती आहे. गौण खनीज उपसा नियमानुसार वाळुसाठा करणे नियमबाह्य आहे. तरीदेखील शहरात मोठ्या प्रमाणात वाळुसाठा असल्याचे चित्र आहे. वाळुसाठ्याला महसूलच्या अधिकाऱ्यांचे अभय असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी शासनाने वाळुमाफियांवर कारवाई करण्याचे ठरविले असले तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाळू तस्करांसोबत असलेले लागेबांधे हे कठोर नियमांची अंमलबजावणी करताना छेद देणारे ठरतील, हे सत्य आहे. अमरावती शहरात वर्धा व बेंबळा नदीतून वाळू विक्रीसाठी आणली जाते. बहुतांश रात्रीलाच वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती आहे. नदीघाटातून क्षमतेपेक्षा जास्त वाळुची वाहतूक करुन ती मोकळ्या जागेवर साठवणूक केली जाते. त्यानंतर व्यावसायिक ही वाळू ट्रकद्वारे बांधकामावर पोहोचवितात. दोन ट्रक क्षमतेची वाळू आणून ती एकच ट्रक असल्याचे भासवून चोरी करण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून कायम आहे. गौणखनीज चोरीतून वाळू तस्कर गब्बर झाले आहेत. वाळुसाठा मध्यवस्तीत असूनही त्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष चालविणे यात गौडबंगाल असल्याचे बोलले जात आहे.
शहरात या भागात
आहे वाळुसाठा
शहरात नियमबाह्य वाळुसाठा अधिक आहे. यात स्थानिक दंत महाविद्यालयासमोरील प्रांगण, कारागृहाच्या मागील बाजूस राष्ट्रीय महामार्गालगतचे खुले मैदान, वडाळी येथील पाण्याच्या टाकीजवळ, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या बंगल्याजवळ, काँग्रेसनगर स्थित गजानन विद्यालय, वलगाव मार्गालगत अॅकेडमिक हायस्कूलचे प्रांगण, बडनेऱ्यात जुना बायपासलगत, महेंद्र कॉलनी येथील खुले मैदान, विलासनगर मार्गावरील हनुमान मंदिराचे मैदान आदी ठिकाणी वाळुसाठा केला आहे.
अवैध वाळुसाठा करता येत नाही. शासन कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. तत्पूर्वी वाळुसाठा करणाऱ्याविरुद्ध त्वरित कारवाई करु.
- किरण गीत्ते,
जिल्हाधिकारी, अमरावती.