शहर कडकडीत बंद !

By Admin | Updated: May 14, 2016 23:59 IST2016-05-14T23:59:49+5:302016-05-14T23:59:49+5:30

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी पुकारलेल्या शहर बंदला व्यापक प्रतिसाद मिळाला.

The city is cracked off! | शहर कडकडीत बंद !

शहर कडकडीत बंद !

गुडेवारांची बदली रद्द करा : नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांची धावपळ
अमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी पुकारलेल्या शहर बंदला व्यापक प्रतिसाद मिळाला. सकाळी १० ते १२ वाजतादरम्यान शहरात सर्वदूर कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत प्रतिष्ठाने उघडण्यात आलीत.
स्वाक्षरी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवक व सामाजिक संघटनांनी शनिवारी शहरबंदची हाक दिली होती. सकाळी १० वाजतापासून नगरसेवक प्रदीप बाजड, धीरज हिवसे, दिनेश बूब, अ.रफीक, इमरान अशरफी आदींनी मुख्य चौकातील प्रतिष्ठानधारकांना बंद पाळण्याचे आवाहन केले. शहरभर सुमारे १० हजार पत्रके वाटल्या गेल्याने व्यापाऱ्यांना बंदची पूर्वकल्पना होती. त्यामुळे अनेकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला राजकमल चौक ते राजापेठ मार्गासह चित्रा चौक, सरोज चौक, अंबादेवी मार्ग, श्याम चौक, बापट चौक, डेपो रोड, अंबागेट, अंबापेठ, गांधी चौक, गाडगेनगर, राधानगर, राठीनगर, सराफा, जवाहरगेट या मध्यवर्त बाजारपेठेत सकाळी १० ते १२ वाजेच्या सुमारास कडकडीत बंद पाळण्यात आला. तथा गुडेवारांचा बदलीचा निषेध करण्यात आला. राजकमल चौकातील मंडपामध्येही बंद यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक व सामाजिक संघटना सरसावल्या.
स्थायी समिती सभापती, अविनाश मार्डीकर, प्रशांत वानखडे, दिनेश बूब, धीरज हिवसे, प्रदीप हिवसे, प्रवीण मेश्राम, गटनेता बबलू शेखावत, अमोल ठाकरे, हमीद शद्दा, अ.रफीक, इमरान अशरफी, सुनील काळे, अरुण जयस्वाल, राजेंद्र महल्ले आदींसह उद्योजक चंद्रकुमार जाजोदीया, बबन रडके, पंजाबराव तायवाडे, अंबादास जावरे, राजू मानकर, नंदकिशोर वऱ्हाडे, आदींनी बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन करत गुडेवारांची आवश्यकता पटवून दिली. शांततेत बंद सुरु असताना पटेल मार्केट तखतमल आणि अंबादेवी मार्गावर अज्ञातांनी दगडफेक केली. टिपू सुलतान संघटनेच्या कार्यकर्त्यांसह युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे बंदची हाक देणारे शांततेच्या बंदचे आवाहन करीत होते. एखाद दुसरा अपवाद वगळता इतरत्र बंदला प्रतिसाद लाभला. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

बदलीविरोधात सर्व एकवटले
अमरावती : दुपारी २ नंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यापाऱ्यांना आपापली प्रतिष्ठाने उघडण्याचे आवाहन केले. एकंदरीतच गुडेवार यांची बदली होऊ नये, झाली ती रद्द करावी, ही मागणी 'बंद'च्या माध्यमातून बुलंद करण्यात आली.
पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या समर्थनार्थ शनिवारी राजकमल चौकातील सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकत्यांनी बंद पूकारला. राजकमल चौकात नेत्यांची भाषणे सुरू असताना अचानक सहयक पोलीस आयुक्त रियाजुद्दीन देशमुख यांच्यासह पोलिसांचा ताफा राजकमल चौकात पोहोचला. आंदोलकर्त्यांना तेथून जाण्यास सांगितले. दरम्यान, विविध नेत्यांनी नकार दिला असता एसीपी देशमुख यांनी तीन मोजेपर्यंत न गेल्यास अटक करावी लागेल, असा इशारा दिला. आमचे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. आम्ही येथून जाणार नाही, अशी भूमिका नेत्यांनी घेतली. यामध्ये पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये चांगलीच गरमागरमी झाली अखेर पोलिसांनाच नमते घ्यावे लागले. आंदोलनात अनेक महिलांचा सहभाग होता.
एसीपी देशमुख म्हणाले, ठोकून काढू
जर दबावात येऊन कुणी दुकाने बंद करण्यासाठी सांगत असेल तर आम्ही अशा लोकांना ठोकून काढू, अशी दबंगगिरी शनिवारी एसीपी रियाजुद्दीन देशमुख यांनी शहरभर केली. अंबानगरीतील नागरिकांनी प्रामाणिक अधिकारी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या समर्थानार्थ व्यापारांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना बंदचे अवाहन केले होते. एसीपी देशमुख यांनी कर्तव्य विसरून पोलीस वाहनातून ताफ्यासह शहरभर फिरून ध्वनिक्षेपकाद्वारे दुकाने उघडण्याची सूचना केली.

प्रभारी सीपी नितीन पवार उतरले रस्त्यावर
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्याची मागणी घेऊन शनिवारी आंदोलनकर्त्यांनी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रभारी पोलीस आयुक्त नितीन पवार यांनी तत्काळ बंदोबस्ताची धुरा हाती घेतली. आंदोलक जयस्तंभ चौकातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद करीत असताना ते वाहनातून रस्त्यावर उतरून हातात काठी घेऊन आंदोलकांमागे धावले. त्यामुळे आंदोलक तेथून पसार झाले. त्यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना बळजबरीने प्रतिष्ठाने बंद करू नका, असे आढळल्यास पोलिसांकडे तक्रार करा, असा सल्लाही दिला. त्यातच राजकमल चौकात आंदोलनाचे आजोजनकर्त्यांना ताकिद देऊन बळजबरीने व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाने बंद करण्यास लावू नका, अशा सूचनाही दिल्यात.

गुडेवारांची बदली निश्चितच चुकीची - रावसाहेब
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे झपाट्याने झाली. त्यातच कामाचा दर्जा सुधारला. अशा स्थितीत वैयक्तिक स्वार्थापोटी अकस्मात बदली होत असेल तर ते निश्चितच चुकीचे आहे. त्यांच्या बदलीमुळे शहराच्या विकास कामांना नक्कीच खीळ बसेल. त्यांनी रखडलेली अनेक कामे मार्गी लावली, दर्जा सुधारला, त्यामुळे बदली ही चुकीचीच आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी दिली.

बहादूर माजी सैनिक संघटनेचे समर्थन
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली न करण्यासंदर्भात बहादूर माजी सैनिक संघटनेने समर्थन दर्शविले आहे. कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संघटनेचे सचिव प्रदीप गायकवाड यांनी दिली.

बंद करण्यासाठी दडपशाहीचा वापर - कुळकर्णी
अमरावती महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कथित बदलीच्या संदर्भात शनिवारी अनेक व्यापारी प्रतिष्ठानांवर गोटमार करून जबरदस्तीने बंद करण्याच्या घटनेचा भाजपाच्यावतीने प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. मनपातील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व विविध नगरसेवकांनी अमरावती बंद करण्यासाठी दडपशाहीचा वापर केला. अनेक ठिकाणी दगडफेक केली. आंदोलनाला लोकसमर्थन प्राप्त नसल्याने आंदोलकांना दंडेली करावी लागली. या दंडेलीचा भाजपा निषेध करीत असून आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी भाजपाची मागणी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Web Title: The city is cracked off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.