सिटी बसची चाके चार तास थांबली
By Admin | Updated: June 11, 2015 00:07 IST2015-06-11T00:07:33+5:302015-06-11T00:07:33+5:30
महापालिका प्रशासनाच्यावतीने ‘आपली परिवहन’ या नावाने सुरु असलेल्या शहर बस सेवेतील चालक, वाहकांनी ...

सिटी बसची चाके चार तास थांबली
आॅटोरिक्षा चालकांची चांदी : प्रवाशांची लूट, सकाळ-संध्याकाळ दोन तास आंदोलन
अमरावती : महापालिका प्रशासनाच्यावतीने ‘आपली परिवहन’ या नावाने सुरु असलेल्या शहर बस सेवेतील चालक, वाहकांनी कंत्राटदारांच्या मनमानी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी दोन तास याप्रमाणे दिवसातून चार तास शहर बसेसची चाके थांबणार आहेत. बुधवारपासून या अभिनव आंदोलनाला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला असून आॅटोरिक्षा चालकांनी प्रवाशांची अक्षरश: लूट चालविल्याचे चित्र बघायला मिळाले.
लाल बावटा शहर बस वाहतूक कामगार संघटनेच्या बॅनरखाली सुरु झालेल्या या आंदोलनात १०० वाहक तर ७० चालक सहभागी झाले आहेत. शहर बसेसचे कंत्राट महापालिकेने अंबा मालप्रवासी व वाहतूक सहकारी संस्थेकडे सोपविले आहे. परंतु या कंत्राटदारांनी कामगार आयुक्त अथवा प्रशासनाला विश्वासात न घेता आयुष बेरोजगार संस्था व साई एन्टरप्राईजेस अशा दोन कामगार कंत्राटदरांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे स्टेशन, बसस्थानकावर तुफान गर्दी
शहर बस कर्मचाऱ्यांनी चार तास बसेसची चाके थांबविण्याचे आंदोलन केल्यामुळे याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला. रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. प्रवासी अधिक, वाहने कमी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आॅटोरिक्षा चालकांनी या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांकडून अधिक भाडे उकळले. या आंदोलनामुळे प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला.