नागरिकांनी मुख्य रस्त्यावर टाकला कचरा!
By Admin | Updated: August 17, 2015 00:08 IST2015-08-17T00:08:18+5:302015-08-17T00:08:18+5:30
जुन्या वस्तीतील इंदिरानगरात संगळून असलेला केरकचरा लगतच्या मुख्य चौकात मधोमध टाकून नगरसेवक तसेच ....

नागरिकांनी मुख्य रस्त्यावर टाकला कचरा!
नगरसेवकांचा निषेध : बडनेऱ्यातील इंदिरानगरवासी संतप्त
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
जुन्या वस्तीतील इंदिरानगरात संगळून असलेला केरकचरा लगतच्या मुख्य चौकात मधोमध टाकून नगरसेवक तसेच महानगरपालिका प्रशासनाचा नागरिकांनी प्रतिकात्मक निषेध नोंदविला. नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत चौकाचौकांत अशाच पद्धतीने केरकचरा रस्त्यावर आणून आंदोलन छेडण्याचा इशारा यातून दिला आहे.
जुन्या वस्तीतील प्रभाग क्रमांक ४१ मधील इंदिरानगर परिसरात कित्येक दिवसांपासून ओला कचरा विद्युत डीबीजवळ संगळून होता. परिसरातील रहिवाशांना या ओल्या कचऱ्याचा मोठा मन:स्ताप सहन करावा लागत होता. रस्त्याच्या कडेलाच संगळून असणारा केरकचरा रस्त्यावर येत होता. सध्या आजाराने तोंड वर काढले आहे. अनेकदा या परिसरातील नागरिकांनी दोन्ही नगरसेवकांना हा कचरा उचलण्याची विनंती केल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. १५ आॅगस्टमुळे केरकचऱ्याचा ढिगारा उचलण्यासाठी नागरिकांनी तगादा लावला होता. मात्र कचरा उचलण्यात आला नाही. त्याचाच रोष व्यक्त करीत परिसर नागरिकांनी १६ आॅगस्ट रोजी रस्त्यावर कचरा साठविला. हा केरकचरा नागरिकांनी सरळ चावडी चौक स्थित चौफुलीवर आणून मनपा प्रशासनाचा व नगरसेवकांचा निषेध नोंदविला.
अशीच स्थिती राहिल्यास प्रत्येक चौकाचौकांत अशा स्वरुपाचे प्रतिकात्मक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
कोरडा, ओला कचरा उचलण्याचा स्वतंत्र ठेका
प्रभागात साफ केलेला केरकचरा प्रभागातच संगळून ठेवला जातो. ठिकठिकाणी असे छोटे कम्पोस्ट करवून ठेवण्यात आले आहे. ‘लोकमत’ने अनेकदा याविरोधात वृत्त प्रकाशित केले आहे. मात्र, महापालिका प्रशासन त्याची दखलच घेत नसल्यामुळे नागरिकांना याचा नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो आहे. ट्रक चालक नियमित संगळून ठेवलेला कचरा उचलत नसल्यामुळेच केरकचऱ्याचे ढिगारे ठिकठिकाणी साचून राहते, हे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. केरकचरा उचलणाऱ्यांची ही जबाबदारी असल्याचे बोलले जात होते.
इंदिरानगरवासीयांनी या परिसरात संगळून असणारा केरकचरा उचलण्याची विनंती संबंधित दोन्ही नगरसेवकांना अनेकदा केली. मात्र नागरिकांची दखल न घेतल्यामुळेच प्रतिकात्मक आंदोलन छेडण्यात आले.
- सुरेश वानखडे,
नागरिक.
संपूर्ण बडनेरा शहरासाठी ओला व कोरडा केरकचरा उचलण्यासाठी केवळ एकमेव ट्रक उपलब्ध करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचा संताप वाढला आहे.
- जयश्री मोरे,
नगरसेविका.
ओल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे या परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. नगरसेवकांनी याची दखल घेणे अत्यंत गरजेचे होते. साफसफाईबाबतचे आंदोलन यापुढे अधिक तीव्र करू.
- श्याम बांते,
नागरिक.
याठिकाणचा ओला व कोरडा कचरा ट्रकद्वारे उचलण्यात यावा, असे मी स्वास्थ्य निरीक्षकास कळविले होते. संगळून असणारा कचरा उचलण्याची जबाबदारी संबंधित विभागाने नीट पार पाडणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे.
- विजय नागपुरे,
नगरसेवक.