पाच रुपयाच्या नोटांकडे नागरिकांची पाठ (सुधारित)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:37 IST2021-01-08T04:37:17+5:302021-01-08T04:37:17+5:30
फोटो पाच रुपयाची नोट अमरावती : भारतीय रिझर्व्ह बँकेने अधिकृतरीत्या चलनात आणलेल्या पाच रुपयाच्या नोटांना नागरिकांसह किरकोळ प्रतिष्ठानांसह मॉल्सनीदेखील ...

पाच रुपयाच्या नोटांकडे नागरिकांची पाठ (सुधारित)
फोटो पाच रुपयाची नोट
अमरावती : भारतीय रिझर्व्ह बँकेने अधिकृतरीत्या चलनात आणलेल्या पाच रुपयाच्या नोटांना नागरिकांसह किरकोळ प्रतिष्ठानांसह मॉल्सनीदेखील पाठ दाखविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भारतीय चलन असलेल्या सर्व कॉईनपासून ते दोन रुपये ते दोन हजाराच्या नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकारात छापून प्रमाणित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे व्यवहारात त्यांना स्थान आहे. मात्र, नागरिकांनी अपभ्रंश करून पाच रुपयाच्या नोटा चालत नसल्याचा निर्वाळा देत ग्राहकांमध्ये अपप्रचार पसरवीत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. याच अनुषंगाने स्टिंग ऑपरेशन केले असता, गजानननगरातील एका दुकानात काही वस्तू खरेदी करून दुकानदाराला पाच रुपयाची नोट दिली. मात्र, त्यांनी चक्क पाचची नोट बंद झाल्याचे सांगितले. यावर असे अधिकृत शिक्कामोर्तब झालेले आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, कुठल्याही व्यवहारात पाच रुपयाची नोट आदान-प्रदान करताना दिसत नाही. गेल्या सहा महिन्यापासून व्यवहारात पाच रुपयाची नोट दिसली नाही. त्यामुळे मीदेखील ती स्वीकारत नाही. यावरून सांगोपांग चर्चेतून नागरिकांनीच चलनातील पाच रुपयाच्या नोटांना व्यवहारातून हद्दपार केल्याचे दिसून येत आहे. यामागील कारण मात्र कुणीच सांगू शकत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्यांच्याजवळ त्या नोटा असतील त्यांनी फेकून द्याव्यात का, फेकल्यास भारतीय चलनाची अवहेलना केल्याचा गुन्हा दाखल होण्याची भीतीदेखील मनात घर करीत असल्याच्या अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.
बॉक्स
बँकांनीसुद्धा नाकारल्याच्या तक्रारी
अनेक ग्राहकांनी पाच रुपयाच्या नोटा बँकेत जमा करण्याकरिता नेल्या असता, तेथील रोखपालांनी त्या नोट स्वीकारल्या नसल्याच्या तक्रारी ऐकण्यास मिळाल्या. यावर एका प्रतिष्ठित बँकेच्या व्यवस्थापकांशी संवाद साधला असता, पाच रुपयाची नोट चलनातून बाद झाल्याविषयी रिझर्व्ह बँकेकडून अधिकृत आदेश वा पत्र प्राप्त झालेले नाही. परंतु ग्राहकांनी काही महिन्यापूर्वी जमा केलेल्या पाच रुपयाच्या नोटा आम्ही स्टेट बँकेत जमा करण्यास पाठविल्या. परंतु, तेथे स्वीकारण्यात आल्या नाहीत, असे सांगण्यात आले.
यापूर्वीही उडाली होती अफवा
सन २०१८ मध्ये पाच रुपयाची नोट चलनातून बाद?, असे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्यावर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी करन्सी बंद करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. त्यामुळे नागरिकांनी भ्रम करून घेऊ नये, असे सांगितल्यानंतर पुन्हा पाच रुपयाच्या नोटा चलनात आल्याचे वास्तव आहे.
कोट
रिझर्व्ह बँकेने सद्यस्थितीत चालू करन्सीतील कुठलीही नोट बंद केल्याचे आदेश वा पत्र प्राप्त नाही. पाच रुपयाच्या कोणत्या प्रकारची नोट स्वीकारली जात नाही, याची माहिती घ्यावी लागेल.
- शैलेश नवाल,
जिल्हाधिकारी