रात्रीच्या पाणी पुरवठ्याने नागरिक त्रस्त

By Admin | Updated: May 29, 2016 00:17 IST2016-05-29T00:17:50+5:302016-05-29T00:17:50+5:30

बडनेऱ्यातील बसस्थानकाला लागूनच असणाऱ्या शारदानगरासह इतरही भागात मूलभूत तसेच प्रामुख्याने पाण्याच्या समस्येने रहिवासी त्रस्त झाले आहेत.

Citizen is suffering from night water supply | रात्रीच्या पाणी पुरवठ्याने नागरिक त्रस्त

रात्रीच्या पाणी पुरवठ्याने नागरिक त्रस्त

नाल्या तुंबल्या, घाणीचे साम्राज्य : पथदिवे नाही, मालधक्क्याच्या वाहतुक ीमुळे अपघाताला आमंत्रण
अमरावती : बडनेऱ्यातील बसस्थानकाला लागूनच असणाऱ्या शारदानगरासह इतरही भागात मूलभूत तसेच प्रामुख्याने पाण्याच्या समस्येने रहिवासी त्रस्त झाले आहेत. सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रहिवाश्यांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. जीवन प्राधिकरणाकडून रात्री पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे रहिवाशांंच्या झोपा उडाल्या आहेत.
१० वर्षांपूर्वी वसलेल्या शारदानगर, साईदत्त नगर, आरपीएफ कॉलनी, जनक रेसीडंस परीसर निर्माण झाला आहे. मात्र, अद्याप बहुतांश घराजवळ सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच नाही. त्यामुुळे सांडपाण्याची विल्हेवाट कशी लागणार, ही समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. काही भागात नाल्या आहेत, तर काही भागात नाही, हा भेदभाव आमच्यासाठी मनस्तापच ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिका प्रशासनाने पक्क्या नाल्या लवकरात लवकर करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. शारदानगर परिसरात जीवन प्राधिकरणचा पाण्याचा पुरवठा गेल्या चार महिन्यांपासून सुरळीत होत नसल्याचे म्हणणे नागरिकांचे आहे. ८ ते १० दिवसानंतर किंवा एखादवेळेस १५ दिवसांतून एकदा पाणी होत असल्याची ओरड नागरिकांची आहे. त्यामुळे या परिसरात पाण्याची टाकी त्वरित देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.
नळातील पाणी धीम्या गतीने येत असल्यामुळे नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नाहीत तसेच रात्री १ वाजता नळाला पाणी येत असल्यामुळे बहुतांश नागरिक रात्रीचे जागरण करून पाणी भरत आहेत. एवढ्या मोठ्या परिसरात दोन ते तीनच हॅन्डपंप आहेत. जीवन प्राधिकरणाकडून व्यवस्थित पाणी पुरवठा नाही व पुरेसे हॅन्डपंप नाही, त्यामुळे पाणी कुठून आणायचे, असा सवाल येथील नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना केला आहे. या भागात सार्वजनिक बगिचा नाही, वस्तीतच झुडपे वाढली आहे, स्वच्छता नाही, नाल्याची स्वच्छता होत नाही, नाल्यांना स्लोप नाही, पाणी बाहेर काढण्याचे नियोजन नसल्यामुळे परिसरातच सांडपाणी जमा राहते, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डुकरांचा संचार, पथदिवे बंद, महिलांना असुरक्षितता वाटते, पथदिवे, वाकडे, हॅन्डपंपची कमतरता, बगिच्याची व्यवस्था नाही आदी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांनी समस्या दूर करून द्याव्या, अशी मागणी आहे. शारदानगराजवळील रस्ता मालधक्कयांकडे जातो, त्यावर सतत ट्रकची भरधाव वाहतूक सुरु असते. त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. महानगरपालिकेने या परिसरात अनेक वर्षांपूर्वी विकासासाठी जागा आरक्षित ठेवली आहे. त्याचा कुठलाच थांगपत्ता नाही, केवळ रस्ते नीटनेटके करवून जमणार नाही तर मूलभूत सोयी मार्गी लावणे गरजेचे आहे. पुढे पावसाळा आहे. त्यामुळे समस्यांचे निराकरण त्वरित करावे, अशी अपेक्षा नागरिक प्रशासनाकडे करीत आहे. 'लोकमत आपल्या दारी' या उपक्रमात शनिवारी सकाळी चमूने नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

Web Title: Citizen is suffering from night water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.