मंगरुळ पोलीस ठाण्याला गावकऱ्यांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:58 IST2018-10-22T00:57:45+5:302018-10-22T00:58:08+5:30
नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेले राजेंद्र निमकर यांच्या मृत्यूनंतर वनविभाग व पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेबाबत कोणतीही दखल न घेतल्याने रविवारी परिसरातील संतप्त शेतकरी व मजुरांनी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याला घेराव घातला.

मंगरुळ पोलीस ठाण्याला गावकऱ्यांचा घेराव
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेले राजेंद्र निमकर यांच्या मृत्यूनंतर वनविभाग व पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेबाबत कोणतीही दखल न घेतल्याने रविवारी परिसरातील संतप्त शेतकरी व मजुरांनी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याला घेराव घातला.
मंगरूळ दस्तगीर येथील शेतकरी राजेंद्र निमकर हे चारा आणण्यासाठी शेतात गेले असता, वाघाने शुक्रवारी त्यांना ठार केले. तद्नंतर वनविभागाने बंदूकधारी वनकर्मचाऱ्यांना तैनात केले. वनविभागाने शनिवारी एक म्हैस वाघाचे अस्तित्व जाणून घेण्याकरिता बांधून ठेवली होती. या वाघाने मध्यरात्री त्या म्हशीची शिकार केली. वाघाचे अस्तित्व सिद्ध होऊनही त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने कोणतीच उपाययोजना न केल्याने व अद्यापही हा वाघ परिसरातच असल्याने शेतात काम करण्यासाठी जाण्यास कुणाचीही हिंमत होत नाही. सध्या शेतमाल गोळा करण्याचा हंगाम सुरू असला तरी वाघाच्या दहशतीमुळे शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. त्यामुळे ४०० ते ५०० शेतकरी व शेतमजुरांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांनी घटनास्थळी दाखल होऊन शांततेचे आवाहन केले. वनविभागाच्या वरिष्ठांच्या निर्देशानंतर वनविभागाच्या पथकाने आलेला पिंजरा घटनास्थळावर रवाना केला.