सीआयडी चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2016 00:12 IST2016-08-19T00:12:39+5:302016-08-19T00:12:39+5:30
पिंपळखुटा येथे घडलेल्या अर्ध नरबळी प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय ....

सीआयडी चौकशी करा
अ. भा. अंनिसची मागणी : आश्रमशाळेला भेट
अमरावती : पिंपळखुटा येथे घडलेल्या अर्ध नरबळी प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांनी केली. शुक्रवारी पिंपळखुटा आश्रमाला त्यांनी भेट दिली. राष्ट्रीय महासचिव हरीष देशमुख यावेळी सोबत होते.
प्रथमेशवरील हल्ल्यापूर्वी आणखी एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला होण्याचा प्रकार आश्रमावरच अंगुलीनिर्देश करणारा आहे. या घटनांना आणि आरोपींना अप्रत्यक्षरित्या आश्रमातूनच सहकार्य मिळाल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत व्हावी, अशी मागणी अ. भा. अंनिसने केली आहे. आरोपी सुरेंद्र मराठे याच्या हालचाली संशयास्पद असताना आणि अजय वणवे या पाचवीतील विद्यार्थ्यावर त्यानेच दगडाने हल्ला केला असताना संस्थेने हा प्रकार जाणीवपूर्वक दडपवला. अजय वणवे याच्यावरील हल्ल्याची चौकशी झाली असती तर प्रथमेशवर आलेली वेळ टळू शकली असती, असे मत उमेश चौबे यांनी व्यक्त केले. चौबे यांच्यासह हरिष देशमुख, पंकज वंजारी, महादेव जाधव, उत्तम सुळे यांनी शंकर महाराज आश्रमातील देवस्थान, शाळा, वसतिगृहाला भेट दिली. विद्यार्थी आणि ग्रामस्थांशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. भेटीदरम्यान आश्रमात अनेक संशयास्पद बाबी आढळल्याचा दावा अंनिसने केला आहे. (प्रतिनिधी)