नाफेड तूर केंद्रावर बच्चूंचा प्रहार

By Admin | Updated: March 4, 2017 00:04 IST2017-03-04T00:04:13+5:302017-03-04T00:04:13+5:30

अचलपूर बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये नाफेडमार्फत सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रावर आ. बच्चू कडू यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता अचानक भेट दिली.

Chuckles at the NAFED Ture Center | नाफेड तूर केंद्रावर बच्चूंचा प्रहार

नाफेड तूर केंद्रावर बच्चूंचा प्रहार

रजिस्टर जप्त : व्यापाऱ्यांचाच माल, शेतकरी रांगेत
परतवाडा : अचलपूर बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये नाफेडमार्फत सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रावर आ. बच्चू कडू यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता अचानक भेट दिली. तेथील भोंगळ कारभाराबद्दल संबंधितांना खडसावले. तेथे व्यापाऱ्यांचाच माल प्रत्यक्षात आढळून आला. रजिस्टरमधील नाव नोंदणी करताना काही रेषा कोऱ्या सोडून व्यापाऱ्यांशी साटेलोटे असल्याचा प्रकार लक्षात आल्याने आमदारांनी ते रजिस्टर ताब्यात घेतले.
येथील बाजार समिती यार्डात ४ जानेवारीपासून तूर खरेदी केंद्र उघडण्यात आले आहे. केंद्रावर व्यापाऱ्यांची तूर रात्रीलासुद्धा खरेदी करून शेतकऱ्यांना पाच सहा दिवस रांगेत ताटकळत ठेवले जात असल्याचा आरोप आहे. संबंधित अधिकारी, ग्रेडर, व्यापाऱ्यांसोबत साटेलोटे असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. आतापर्यंत केंद्रांवर २२ हजार क्विंटल तूर हमीदराने खरेदी करण्यात आली. ८ कोटी ६० लक्ष रुपयांचे वाटप धनादेशाद्वारे केल्याची माहिती आकाश धुर्वे, आर.जी. गोहत्रे आदींनी दिली.

आधी शेतकऱ्यांची तूर मोजा!
अमरावती : केंद्र शासनाने विदेशातून १८ हजार रुपये क्विंटल डाळ आयात केली. त्यावर दोन हजार रुपये क्विंटल खर्च अशी एकूण वीस हजार रुपये क्विंटल दराने खरेदी केली आणि देशातील शेतकऱ्यांची तूर पाच हजार रुपये दराने खरेदी करीत असल्याने गोरगरीब शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देणारे शासन शेतकरी विरोधी असल्याचा आरोप आ. कडूंनी लोकमतशी बोलताना केला. विदेशात तूर उत्पादनासाठी शेतजमीन भाडेतत्त्वार घेऊन कोट्यवधी रुपये दिले. तो खर्च या देशातील शेतकऱ्यांना का देण्यात आला नाही. येथे शेतकऱ्यांवर विमा नसल्याने जमिनी नापेर राहिल्याचे ते म्हणाले. व्यापाऱ्यांशी साटेलोटे करण्यापेक्षा शेतकऱ्यांची तूर मोजून त्यांना विनाविलंब धनादेश द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत आ. कडूंनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना सुनावले. यावेळी गजानन मोरे, अंकुश जवंजाळ, दीपक धुळधर, श्याम कडू, गोपाल शेळके, वैभव निकमसह अन्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

आमदारांनी राबविले धाडसत्र
उपविभागीय अधिकारी कार्यालयात नियोजित बैठकीला जात असताना शुक्रवारी आ. बच्चू कडू यांनी पूर्वसूचना न देता नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर धाड टाकली. यार्ड परिसरात तुरीच्या गंजी आढळल्या. त्याची विचारणा केल्यावर एकमेकांना नाव विचारू लागले. त्यावर आक्रमक होताच व्यापाऱ्यांची नावे पुढे आलीत. रजिस्टरची मागणी करताच संबंधित ग्रेडर व अधिकाऱ्यांचा प्रताप उघडकीस आला. शेतकऱ्यांची नावे लिहिताना मधात क्रमांक टाकून रेषा कोऱ्या सोडण्यात आल्या होत्या. त्यावर नंतर व्यापाऱ्यांची तूर शेतकऱ्यांच्या नावावर तोलण्याचा प्रकार होता. आ. बच्चू कडूंनी ती पाने फाडून रजिस्टर जप्त करीत संबंधितांना खडेबोल सुनावले.

Web Title: Chuckles at the NAFED Ture Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.