चिऊताईवर आधुनिकीकरणाचे संकट
By Admin | Updated: March 20, 2016 00:13 IST2016-03-20T00:13:08+5:302016-03-20T00:13:08+5:30
घराच्या सभोवताल वावरणारी चिमणी आधुनिकीकरणाच्या विळख्यात सापडली आहे. चिमण्यांना वाचविणाची काय करता येईल,...

चिऊताईवर आधुनिकीकरणाचे संकट
चिमणी दिवस : सिमेंटच्या जंगलात हरवल्या चिमण्या
अमरावती : घराच्या सभोवताल वावरणारी चिमणी आधुनिकीकरणाच्या विळख्यात सापडली आहे. चिमण्यांना वाचविणाची काय करता येईल, यांची जाणीव ठेवणे आपलीच जबाबदारी आहे. चिऊताईला अभय देऊन खाद्य व राहण्याची सोय करणे हीच खरी मानवता आहे. चिमणी दिवसानिमित्त सिमेंटच्या जंगलात हरवलेल्या चिमण्यांसाठी काही तरी करा, असा संदेश निसर्गप्रेमींनी दिला.
२० मार्च रोजी चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात ७ प्रकारच्या चिमण्या असून आपल्या भागातील सर्वात लाडकी चिमणी म्हणजे हाऊस स्पॅरो आहे. तिचा आकार १४ ते १६ सेमी असून वजन २६ ते ३२ ग्राम असते. १९ ते २५ सेमी पंखांचा विस्तार असतो. एकेकाळी या चिमण्या भारतातील सर्वाधिक संख्येने आढळत होत्या. मात्र अलीकडच्या काळात त्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे तिची जागा बुलबुलने घेतली आहे. चिमण्यांसाठी घरटी व उन्हाळ्यात पाणी तर ठेवाच तरच अंगणात येऊन चिमण्या चिवचिवाट करतील. घरातील घरटी कचरा होते म्हणून काढून फेकू नका. त्याचाच उपयोग करून चिमण्याची राहण्याची सोय करा.
वैभवच्या घराभोवती चिमण्यांचा किलबिलाट
अभियंता कॉलनी परिसरातील टिटी नगरात राहणारा पक्षीप्रेमी वैभव ठाकरे याने पक्षांच्या दाण्यापाण्याची सोय केल्यामुळे त्यांच्या घराभोवती चिमण्यांचा किलबिलाट नेहमीच असतो. एखाद्या दिवशी खाद्य टाकण्यास थोडा उशीर झाला तर चिमण्या त्यांच्या दारावरसुध्दा चोची मारतात, हा अनुभव वैभवनेच व्यक्त केला. त्यांच्या घराभोवतच्या तारेवर जणु पक्ष्यांची शाळाच भरते. यामध्ये वैभवला त्याचे आई-वडील अनिल ठाकरे व संगीता ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
आपला सांस्कृतिक वारसा, जैवविविधतेत महत्त्वाचे स्थान आणि पर्यावरण संतुलनात चिमण्या महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांना वाचविण्यास प्रत्येक नागरिकांनी हिरीरीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक, अमरावती