‘नोकरी’ची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST2021-07-27T04:14:05+5:302021-07-27T04:14:05+5:30
कोरोनाकाळात नोंदणी विवाह माघारले, जानेवारीपासून वाढले रजिस्ट्रेशन अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे आगमन झाले. काेविड-१९ चा फटका सर्वच क्षेत्राला ...

‘नोकरी’ची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर
कोरोनाकाळात नोंदणी विवाह माघारले, जानेवारीपासून वाढले रजिस्ट्रेशन
अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे आगमन झाले. काेविड-१९ चा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. विशेषत: राज्य शासनाने विविध विभागात कोरोनामुळे पदभरतीला ब्रेक लावला आहे. त्यामुळे शिक्षित असूनही नोकरी, रोजगार नाही, अशी स्थिती तरुणाईची आहे. परिणामी वय झाले असतानाही लग्न करू शकत नाही आणि नोंदणी विवाहाचा तर प्रश्नच नाही, असे वास्तव आहे. त्यामुळे कोरोनाकाळात विवाहासाठी नोंदणी माघारल्याचे चित्र आहे.
कोरोनापूर्वी रजिस्टर्ड मॅरेज करण्यासाठी युवक-युवतींची पसंती होती. त्यामुळे ऑनलाईन नोंदणीद्वारे मुला-मुलींच्या दोन्ही कुटुंबीयांच्या साक्षीने सरकारी कार्यालयात विवाह सोहळे पार पडले. मात्र, गत दीड वर्षापासून नोंदणी विवाहाला काहीसा ब्रेक लागला आहे. कोरोनामुळे रोजगार नाही, नोकरी नाही केव्हा लग्न करणार, कसा संसार थाटणार, असे एक ना अनेक प्रश्न, समस्या तरुणाईपुढे भेडसावत आहे.
----------------------
आता रजिस्टर नोंदणीत वाढ
कोरोनाकाळात नक्कीच रजिस्टर नोंदणी माघारली होती. मात्र, यंदा जानेवारीपासून कमी, अधिक प्रमाणात विवाहोत्सुक युवक-युवतींची ऑनलाईन नोंदणी वाढत आहे. दरदिवशी चार ते पाच विवाह होत आहेत.
-पी.व्ही. खंडेराय, विवाह नोंदणी अधिकारी, अमरावती.
--------------
कधी किती झाले नोंदणी विवाह?
२०१८-------------- ९३३
२०१९---------------------९७३
२०२०-----------------८३१
२०२१ जानेवारी--------- १५९
२०२१ फेब्रुवारी-------------६२
२०२१ मार्च-------------- ११३
२०२१ एप्रिल------ ८७
२०२१ मे------------३६
२०२१ जून------------ ६५
२०२१ जुलै------------- ४७
-------------
यंदा सात महिन्यात कमी-अधिक प्रमाणात नोंदणी
१) यंदा जानेवारीपासून रजिस्टर नोंदणीला कमी-अधिक प्रमाणात ऑनलाईन नोंदणी होत आहे. दरदिवशी चार ते पाच जाेडणी विवाह बंधनात अडकत आहेत.
२) कोरोनामुळे संचारबंदी लागू असून, सार्वत्रिक विवाह सोहळ्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे रजिस्टर्ड मॅरेज नोंदणी वाढत आहे. गरीब, सामान्य कुटुंबातसुद्धा रजिस्टर्ड मॅरेजला पसंती आहे.
-----------
कोरोना कधी जाईल, याची प्रतीक्षा आहे. गत दीड वर्षापासून रोजगाराचा पत्ता नाही. वय निघून जात आहे. काय करावे, सुचत नाही. आता तरी कोरोना जाईल आणि नोकरी, कामधंदा शोधून लग्न होईल, अशी अपेक्षा आहे.
- अभिजित कावळे.
--------
अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. नोकरी लागल्यानंतर लग्न करू, असे स्वप्न आहे. मात्र, कोरोनामुळे शासकीय, खासगीतही नोकरभरती नाही. असे किती दिवस प्रतीक्षा करावी, हे समजत नाही.
- रंजना मोरे.