चिमुकल्याला मिळाला पुनर्जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:19 IST2021-02-23T04:19:27+5:302021-02-23T04:19:27+5:30
फोटो पी २२ चिमुकला वैद्यकीय सेवा ठरली देवदूत : छातीत प्ल्युरल इन्फ्युजनचे निदान चिखलदरा : प्ल्युरल इन्फ्युजनचे निदान झालेल्या ...

चिमुकल्याला मिळाला पुनर्जन्म
फोटो पी २२ चिमुकला
वैद्यकीय सेवा ठरली देवदूत : छातीत प्ल्युरल इन्फ्युजनचे निदान
चिखलदरा : प्ल्युरल इन्फ्युजनचे निदान झालेल्या मेळघाटातील सहा महिन्याच्या राकेश कासदेकर या चिमुकल्यावर आरोग्य विभागाच्या कार्यतत्परतेमुळे वेळीच शस्त्रक्रिया झाल्याने त्याला पुनर्जन्म मिळाला आहे. वैद्यकीय सेवा देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया त्याचे कुटुंबीय व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
चिखलदरा तालुक्यातील टेम्ब्रू येथील अवघ्या सहा महिन्याच्या राकेश रामा कासदेकर याला १४ जानेवारी रोजी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. वैद्यकीय उपचारांसाठी राकेशचे कुटुंबीय तयार नव्हते. मात्र, ही माहिती कळताच गावातील आरोग्य सेविका स्मिता राऊत, आशा सेविका सुनीता कासदेकर यांनी कासदेकर कुटुंबीयांचे समुपदेशन करून बाळाची डॉ. सागर कोगदे यांच्याद्वारे वैद्यकीय तपासणी करून घेतली. तपासणीअंती बाळाची आरोग्य स्थिती चांगली नसल्याचे आढळल्याने तात्काळ रुग्णवाहिका बोलावून चुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचा०यांनी राकेशच्या आई-वडिलांना धीर व विश्वास दिला. चुर्णी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. दारसवार यांच्या सल्ल्यानुसार बाळाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यासाठी सर्व संदर्भ सेवा कुटुंबाला उपलब्ध करून देण्यात आल्या.
जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाल्यावर बालरोगतज्ज्ञांमार्फत बाळावर तत्काळ वैद्यकीय उपचार व तपासणी सुरू करण्यात आली. छातीत प्ल्युरल इन्फ्युजनचे निदान झाले. बाळाला सगळ्या प्रकारची प्रतिजैविके देऊनही त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा दिसून येत नव्हत्या. प्रकृती जास्त गंभीर व अत्यवस्थ होत असल्याचे दिसून येत असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हुमणे यांना पाचारण करण्यात येऊन त्यांच्या मार्गदर्शनात शस्त्रक्रिया करून उपचार करण्याचे ठरविण्यात आले.
अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
बाळाच्या प्ल्युरल स्पेसमध्ये विशेष प्लास्टिक ट्यूब टाकून पस बाहेर काढणे म्हणजेच आयसीडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. संतोष राऊत यांनी यशस्वीरीत्या केली. बालरोगतज्ज्ञ डॉ. नागलकर यांच्या औषधोपचाराखाली राकेशला पुनर्जन्म मिळाला. त्याची प्रकृती आता चांगली असून, नैसर्गिकरीत्या श्वासोच्छवास होत आहे. राकेशच्या आई-वडिलांच्या चेह०यावर आनंद फुलला आहे. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सांघिक समन्वयातून यशस्वी झाल्याबद्दल डॉ. निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, सामान्य रुग्णालयातील संपूर्ण डॉक्टर, परिचारिका चमू, ग्रामीण रुग्णालय चुर्णी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी- कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर आदींचे अभिनंदन होत आहे.