उशिरा सुरु होणार मिरची बाजार

By Admin | Updated: August 30, 2014 01:08 IST2014-08-30T01:08:03+5:302014-08-30T01:08:03+5:30

तालुक्यात मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

The chilli market will start late | उशिरा सुरु होणार मिरची बाजार

उशिरा सुरु होणार मिरची बाजार

सतीश बहुरुपी राजुराबाजार
तालुक्यात मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी १५ आॅगस्टपासून सुरु होणारी मिरचीची बाजारपेठ यावर्षी एक महिना उशिरा सुरु होणार असल्याचे संकेत असल्याने मिरची उत्पादकांसह व्यापारी, मापारी आणि मजुरांनासुध्दा याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
शेकडो हातांना काम देणारी ही बाजारपेठ असल्याने मजुरांनासुध्दा सुगीचे दिवस येतात. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामळे मिरची उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तालुक्यात संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातात. परंंतु गत काही वर्षांपासून या भागात संत्र्याच्या उत्पादनात घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता मिरचीचे पीक घेणे सुरु केले होते. शेकडो क्विंटल मिरची राजुरा बाजारच्या मिरची बाजारात विक्रीसाठी येत होती. मिरची कच्चा माल असल्याने परत नेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात विकून मोकळे व्हावे लागते. रात्रीतून मिरची देवाण-घेवाण करणारी राजुराबाजारची बाजारपेठ ही विदर्भात मिरचीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. येथून कलकत्ता, मुंबई, दिल्ली, जबलपूर, नागपूर, हैद्रबादसह राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश छत्तिसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह देशाच्या कानाकोपऱ्यात येथून मिरची पाठविली जाते. एवढेच नव्हे, तर पाकिस्तान, बांग्लादेश, दुबई, सौदी अरब राष्ट्रांसह आदी देशात येथील मिरचीला अधिक मागणी असल्याने निर्यात केली जाते.
कृषी उत्पन्न बाजर समितीचा उपबाजार असलेल्या राजुराबाजार मिरची बाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. तर ५०० ते ६०० मजुरांच्या हाताला काम मिळते. तर बाजार समितीला सुध्दा सुरुवातीच्या काळात तीन ते ेचार हजार रुपये 'सेस' मिळतो. हंगामात हा सेस २० ते २५ हजार रुपयापर्यत उत्पन्न मिळवून देत असल्याचे सांगण्यात येते. तर वाहतूकदारांनासुध्दा चांगली संधी मिळते. येथून परप्रांतात मिरची पाठविताना मंडीमध्ये पोहचण्याचे वेळेचे बंधन असल्याने व्यापाऱ्यांकडून तीन ते चार हजार रुपये वाहन चालकाला बक्षिसापोटी दिले जाते.
दरवर्षी राजुऱ्याचा मिरची बाजार १५ आॅगष्टपासून सुरु होतो. परंतु यंदा पावसाने दडी मारल्याने उमेदीच्या काळात मिरची सुकण्याच्या मार्गावर होती. आता आलेल्या पावसाने मिरचीला थोडी नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Web Title: The chilli market will start late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.