बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: September 10, 2015 00:10 IST2015-09-10T00:10:01+5:302015-09-10T00:10:01+5:30
दीड वर्षाच्या चिमुरड्यावर बोगस डॉक्टरने चुकीच्या पध्दतीने उपचार केल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे बालकाचा मृत्यू
सोनोरा येथील घटना : डॉक्टरने काढला पळ, शोधार्थ पोलीस पथक रवाना
चांदूररेल्वे : दीड वर्षाच्या चिमुरड्यावर बोगस डॉक्टरने चुकीच्या पध्दतीने उपचार केल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना चांदूररेल्वे तालुक्यातील सोनोरा (भिलटेक) येथे मंगळवारी सायंकाळी घडली. घटनेनंतर बोगस डॉक्टरने घटनास्थळाहून पोबारा केला. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव सोहम अजय खोब्रागडे असे आहे. सर्दी खोकला व ताप आल्याने त्याला गावानजीकच्या पळसखेड येथील डॉक्टर आशिष रॉय यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. डॉक्टर रॉय याने बालकाची तपासणी करुन औषधी दिली. औषध घेताच सोहमची प्रकृती खालावली. तातडीने त्याला चांदूररेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सोहमचा मृत्यू चुकीच्या औषधोपचाराने झाला असा आरोप सोहमच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनेनंतर बोगस डॉक्टर पसार झाला. चांदूररेल्वेचे ठाणेदार बोबडे यांनी डॉक्टरला शोधण्यासाठी विशेष पथक पळसखेडकडे रवाना केले आहे. ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचाी संख्या अधिक असल्याची ओरड सतत होत असते. या डॉक्टरांकडून ग्रामस्थांच्या आरोग्यासोबत सुरू असलेला खेळ थांबविण्यासाठी कडक कारवाईची गरज आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)