शंकरबाबांच्या मुलांनी दिला स्वयंरोजगाराचा आदर्श

By Admin | Updated: November 15, 2015 00:03 IST2015-11-15T00:03:36+5:302015-11-15T00:03:36+5:30

अंध विदूर फराळाच्या माल विक्रीची ओरडून जाहिरात करत होता, तर बाकी मुके मुले-मुली त्या मालाची विक्री करून पैसे जमा करीत होते.

Children of Shankarbaba gave the ideal of self-employment | शंकरबाबांच्या मुलांनी दिला स्वयंरोजगाराचा आदर्श

शंकरबाबांच्या मुलांनी दिला स्वयंरोजगाराचा आदर्श

अंध विदूरने सांभाळले स्टॉल : दिवाळीच्या फराळाची विक्री
सुनील देशपांडे अचलपूर
अंध विदूर फराळाच्या माल विक्रीची ओरडून जाहिरात करत होता, तर बाकी मुके मुले-मुली त्या मालाची विक्री करून पैसे जमा करीत होते. दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली होती. अवघ्या दोन तासांत २५ हजार रुपयांच्या फराळाची विक्री केल्यानंतर शनिवारी विरंगुळा म्हणून सर्वजण हिंदी चित्रपट बघायला गेले होते. मूक-बधिर मुलांनी दिवाळीच्या फराळाच्या विक्रीचा स्टॉल लावून धडधाकट बेरोजगार युवकांपुढे फार मोठा स्वयंरोजगाराचा आदर्श निर्माण केला आहे.
वझ्झरस्थित स्व. अंबादासपंत वैद्य विकलांग अनाथालयातील मूकबधिर मुलांनी अनारसे, करंजी, लाडू, शंकरपाळे, चिवडा या दिवाळीतील पदार्थांच्या विक्रीचे दुकान लावले होते. गुरुवारी त्यांनी अवघ्या दोन तासांत संपूर्ण माल विकून मोकळा केला. यात त्यांना एकूण २५ हजार रुपये मिळाले. या मालाकडे ग्राहकांचे लक्ष वेधावे यासाठी अंध, विदूर ओरडून मालाचे वर्णन करीत होता, गांधारी वतिच्या सहकाऱ्यांनी मालाची विक्री करून पैसे घेतले.
१० दिवसांपासून फराळासाठी दुकानातून सामान आणणे, फराळ बनविणे, दुकान लावणे आदी कामात व्यस्त झालेल्या सर्व मूकबधिर मुलांना थकवा आला होता. विरंगुळा म्हणून स्वत:च्या मेहनतीतून कमावलेल्या पैशातून शनिवारी ते सर्वच लगतच्या चित्रपटगृहात सिनेमाला गेले होते.

मालही स्वत: तयार केला

दिवाळीनिमित्त या मुलांनी फराळ विक्रीचा बेत आखला होता. फराळ तयार करण्यासाठी त्यांना चार ते पाच दिवस लागले होते. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते कन्यादान झालेल्या शोभा अमित पापळकर हिच्या मार्गदर्शनात ८ ते १० मूक-बधिर विद्यार्थ्यांनी हा फराळ तयार केला. त्यासाठी त्यांनी १० हजार रुपयांचे फराळाचे साहित्य खरेदी केले. या स्टॉलवर करंजी आणि अनारसे या दोन पदार्थांना सर्वाधिक मागणी होती.

शंकरबाबांची संकल्पना
ही सर्व कल्पकता मूक-बधिर मुलांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांची होती. ते म्हणाले, शासन कुणाकुणाला नोकऱ्या देणार? मूकबधिर मुलांनी स्वयंसिद्ध बनावे, स्वत:च रोजगार निर्माण करावा, यासाठी दिवाळीच्या फराळ विक्रीच्या स्टॉलची कल्पना मनात आली आणि या मुलांनी ती जिद्दीने पूर्ण केली. या मुलांनी भविष्यात मोठे व्यापारी, उद्योगपती व्हावे, अशी इच्छा त्यांनी वर्तविली.

Web Title: Children of Shankarbaba gave the ideal of self-employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.