मुलाने केली जन्मदात्याची हत्या
By Admin | Updated: December 22, 2015 00:10 IST2015-12-22T00:10:29+5:302015-12-22T00:10:29+5:30
जन्मदात्याला बेदम मारहाण करुन त्यांची हत्या केल्यानंतर प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून नैसर्गिक मृत्यूचा देखावा ...

मुलाने केली जन्मदात्याची हत्या
पिंपरी येथील घटना : नैसर्गिक मृत्यू झाल्याचा देखावा
मोर्शी : जन्मदात्याला बेदम मारहाण करुन त्यांची हत्या केल्यानंतर प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून नैसर्गिक मृत्यूचा देखावा रचणाऱ्या कूपुत्रास मोर्शी पोलिसांनी अटक केली. ही घटना १६ डिसेंबर रोजी नजीकच्या पिंपरी येथे घडली. मध्यप्रदेशातील शेत विकून ट्रॅक्टर घेऊन देण्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे पित्याला जीव गमवावा लागला.
आरोपीचे नाव दिनेश शिवलाल डिगरसे (३०, रा. पिंपरी)असे असून मृत पित्याचे नाव शिवलाल साजिव डिगरसे (७०) असे आहे. शिवलाल साजिव डिगरसे हे पिंपरी येथे पत्नी आणि लहान मुलासोबत राहात होते. आरोपी दिनेश हा त्याच्या पत्नीसोबत गावातच वेगळा राहतो. मृत शिवलाल यांना मध्यप्रदेशात दीड एकर शेत मिळाले होते. हे शेत विकून त्या पैशात ट्रॅक्टर घेऊन देण्याचा तगादा दिनेश याने वडिलांकडे लावला होता. परंतुु वडील त्याला दाद देत नव्हते.
१६ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आरोपीची आई, लहान भाऊ आणि पत्नी शेतात गेल्याचे पाहून आरोपीने वडिल शिवलाल यांचेकडे पुन्हा ट्रॅक्टर घेऊन देण्याची मागणी केली. परंतु मुलाची मागणी शिवलाल यांनी धुडकावली. यावरुन संतप्त झालेल्या दिनेशने वडील शिवलाल यांना खाटेच्या लाकडी ठाव्याने बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. अंतर्गत रक्तस्त्रावाने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना त्याच अवस्थेत सोडून तो तेथून निघून गेला.
सायंकाळी शिवलालची पत्नी आणि लहान मुलगा घरी आल्यावर त्यांना शिवलाल गंभीर अवस्थेत आढळून आले. त्यांना तत्काळ अंबाडा येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तथापि प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मोर्शीला नेण्याचा तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबरला मृत शिवलाल यांच्या अंतिम संस्काराची तयारी सुरु झाली. त्यात आरोपी दिनेश सुध्दा सहभागी होता. मात्र, दरम्यान अज्ञात व्यक्तीने मोर्शी पोलिसांना घटनेची माहिती देऊन शिवलाल यांच्या मृत्युबाबत संशय वर्तविला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार देशमुख यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद कडू यांना घटनास्थळी पाठविले. कडू यांना मृताच्या अंगावर मारहाणीचे वळ दिसून आले. त्यांनी अंतिम संस्कारापूर्वी मृताचे शवविच्छेदन करण्याचा सल्ला कुटुंबीयांना दिला.
येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर खूनाचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मोर्शी पोलिसांनी हत्त्येचा गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली. (तालुका प्रतिनिधी)