अल्पवयिनांनो सावधान, तुमच्यावर पोलिसांची नजर!
By Admin | Updated: February 2, 2016 00:07 IST2016-02-02T00:07:15+5:302016-02-02T00:07:15+5:30
कधी पोलिसांची नजर चुकवत तर कधी निडरपणे वाहन हाकणाऱ्या अल्पवयिनांवर पोलिसांची करडी नजर आहे.

अल्पवयिनांनो सावधान, तुमच्यावर पोलिसांची नजर!
सहायक पोलीस अधीक्षकांचे निर्देश : विनाक्रमांकाच्या वाहनांवर कारवाई
अमरावती : कधी पोलिसांची नजर चुकवत तर कधी निडरपणे वाहन हाकणाऱ्या अल्पवयिनांवर पोलिसांची करडी नजर आहे. वाहनपरवाना आणि वय पूर्ण नसताना हे अल्पवयीन विद्यार्थी कधी ट्रिपलसिट तर कधी चौबलसिट वाहने हाकतात. त्यावर आता वाहतूक पोलिसांकडून अंकुश लागणार आहे. तसे निर्देशच सहायक पोलीस आयुक्त बळीराम डाखोरे यांनी दिले आहेत.
नवनियुक्त पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक आणि उपायुक्त नितीन पवार या द्वयीने शहरातील अनियंत्रित वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे निर्देश दिल्याने मागील काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी विनाक्रमांकाच्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
अल्पवयीन मुलांचे दुचाकी प्रेम ‘लोकमत’ने सोमवारी चित्रमय वृत्ताद्वारे वाचकांसमोर ठेवले होते. त्याची दखल घेत शाळा, आणि महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांनी पायी गस्ती वाढवून चाणाक्षपणे अशा वाहनचालकांवर कारवाई केली. तसेच अशी वाहने आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. अशा अल्पवयीनांवर कायदेशीर कारवाई करू, अशी ग्वाहीदेखील प्रभारी एसीपी बळीराम डाखोरे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
अल्पवयीन वाहन चालकांवर अंकुश घाला
अमरावती : बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींवर कायमस्वरुपी अंकुश लावावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सोमवारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पोलीस उपायुक्त नितीन पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.
‘यांच्यावर अंकुश कुणाचा?’ या वृत्तातून ‘लोकमत’ने अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून बेदरकारपणे होणाऱ्या वाहतुकीवर प्रकाश टाकला. त्याची दखल घेत विद्यार्थ्यांनी उपायुक्तांची भेट घेत, अशा वाहनचालकांविरुद्ध धडक मोहीम राबविण्याची विनंती केली. ही मोहीम औटघटकेची न ठरता यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी शुभम देशमुख, प्रतीक देशमुख, राहुल जायले, विवेक उमक, अक्षय दरवई, रोहित खंडारे, जय देशमुख, शुभम डिवरे, अक्षय ओलीवकर आणि वैभव जपुलकर यांनी केली आहे.
शहरातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी तोंडाला रुमाल बांधून विनापरवाना वाहने चालवितात. त्यांना दंड न ठोठावता थातूरमातूर कारवाई करून वाहतूक पोलीस खिसे भरतात, असा आरोपही त्यांनी केला.(प्रतिनिधी)