चिखलदरा तहसीलवर महिलांचा 'घागर मोर्चा'
By Admin | Updated: May 14, 2016 00:13 IST2016-05-14T00:13:05+5:302016-05-14T00:13:05+5:30
शेकडो योजना राबवूनदेखील आदिवासींच्या नशिबातील मरणयातना संपल्याच नाहीत़ कोसोदूर अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागते़.

चिखलदरा तहसीलवर महिलांचा 'घागर मोर्चा'
तहसीलच्या आवारात फोडल्या घागरी : पाणीटंचाईचा प्रश्न पेटला
चिखलदरा : शेकडो योजना राबवूनदेखील आदिवासींच्या नशिबातील मरणयातना संपल्याच नाहीत़ कोसोदूर अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागते़. माजी जिल्हा परिषद सदस्या संगीता ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शासनाच्या विरोधात चिखलदरा तहसीलवर विराट आदिवासी महिलांचा घागर मोर्चा काढून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी तहसीलदारांना पिण्याच्या पाण्यासाठी निवेदन दिले़.
मेळघाटातील आदिवासींना आजस्थितीत ४५ डिग्री तापमानात पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते़ एकीकडे शहरी भागात शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत असला तरी मेळघाटातील पाण्याची समस्या मिटलेली नाही़ भरउन्हात आपली तहान भागविण्यासाठी वणवण भटकणाऱ्या आदिवासींना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आ़मदार राजकुमार पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य संगीता ठाकरे यांच्या नेतृत्वात चिखलदरा तहसीलवर शासनाच्या विरोधात पाण्यासाठी आदिवासी महिलांचा घागर मोर्चा काढण्यात आला़ नगर परिषदपासून हा मोर्चा निघाला़ डोक्यावर घागरी घेऊन शेकडो महिला तहसीलकडे वाटचाल करीत होत्या. हे दृश्य पाहून अनेकांचे लक्ष वेधले जात होते़. तहसील कार्यालयात पोहोचून पाण्याची समस्या तातडीने सोडविण्याबाबत तहसीलदार किशोर बागडे यांना निवेदन दिले़. यावेळी महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल ठाकरे, तालुकाध्यक्ष अरूण सपकाळ, महिला अध्यक्ष किरण घोडके, शंभूदादा खडके, गजेंद्र कस्तुरे, नगरसेवक कल्पना खांडे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सेवा दल व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़. (तालुका प्रतिनिधी)
सरकारच्या रागावर फोडल्या घागरी
अनेकदा पाणीटंचाई संदर्भात निवेदने देऊनसुद्धा आज अद्यापपावेतो पाऊल उचलले नाही़ त्यामुळे शासनाच्या व प्रशासनाच्या सरणावर शेवटची मडकी फोडण्यास आम्ही मेळघाटातील रहिवासी तयार आहोत, असे म्हणून तहसील कार्यालयाच्या आवारात मडकी फोडून शासनाचा निषेध करण्यात आला़.
आया-बहिणींचा त्रास केव्हा संपणार?
गत अनेक वषार्पासून मेळघाटातील आदिवासींना न्याय मिळाला नाही. आज आमच्या आदिवासी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तरीदेखील शासनाला जाग आली नाही. राज्य सरकारला आदिवासींप्रती संवेदना संपल्या असून आमच्या माय बहिणींचा त्रास केव्हा संपणार असा प्रश्न माजी जिल्हा परिषद सदस्या संगीता ठाकरे यांनी उपस्थित केला.