चिखलदरा-मेळघाट पर्यटन महोत्सव

By Admin | Updated: January 22, 2017 00:13 IST2017-01-22T00:13:39+5:302017-01-22T00:13:39+5:30

विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळी दरवर्षी साजरा होणारा पर्यटन महोत्सव यावर्षी आता चिखलदरा मेळघाट-महोत्सव....

Chikhaldara-Melghat Tourism Festival | चिखलदरा-मेळघाट पर्यटन महोत्सव

चिखलदरा-मेळघाट पर्यटन महोत्सव

विविध कार्यक्रमांची मेजवानी : पर्यटकांसाठी मनोरंजन, खवय्येगिरीवर भर
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळी दरवर्षी साजरा होणारा पर्यटन महोत्सव यावर्षी आता चिखलदरा मेळघाट-महोत्सव या नावाने २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान विविध रंगारंग कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार असून त्यादृष्टीने चिखलदरा नगरपरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व तहसील प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
या महोत्सवात देशभरातील पर्यटकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात राहील. यावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. पर्यटन महोत्सव नियोजनाच्या दृष्टीने पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याअगोदरच पार पडली आहे. पर्यटन महोत्सव आयोजनाबाबत जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी जिल्हास्तरावरून वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहेत.
प्रसिद्धीवर विशेष भर
एकेकाळी हील स्टेशन असलेल्या पर्यटन महोत्सवामध्ये देश-विदेशातील पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होत असे. त्याच धर्तीवर चिखलदराचे सौंदर्य, नैसर्गिकरीत्या खुलवत पुन्हा देश-विदेशातील पर्यटकांची महोत्सवासह पूर्ण वर्षभर उपस्थिती राहावी, त्यांची संपूर्ण व्यवस्थेच्या दृष्टीने प्रसिद्धीवर विशेष भर देण्यात आला आहे.
चारही दिवस लावणी
चिखलदरा-मेळघाट पर्यटन महोत्सव २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान साजरा होत असताना या महोत्सवात हास्य कविसंमेलन, भरत गणेशपुरे यांचे ‘चला हवा येऊ द्या’ यासोबतच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे नियोजन असून चारही दिवस महाराष्ट्रीयन लावणी विशेष आकर्षण म्हणून ठेवण्यात आली आहे.
सोबतच मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृतीचे दर्शन पर्यटकांना घडावे, यावरही पहिल्यांदाच मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या खास आग्रहास्तोवर आदिवासी नृत्य स्पर्धासुद्धा राहणार आहे. त्या स्पर्धेला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बक्षीस जाहीर केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

पालकमंत्र्यांचे खास लक्ष
विदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरा-मेळघाट पर्यटन महोत्सवात पालकमंत्री प्रवीण पोटे व अमरावतीचे आमदार सुनील देशमुख यांनी विशेष लक्ष देऊन पर्यटकांकरिता जंगल सफारी, गाविलगढ भ्रमण, विविध दर्शनीय पॉईन्टवर व्हॅली क्रॉसिंग, पॅराग्लायडींग, जैवविविधतेसह कॉफी मळे, नौका विहार आदी मनोरंजनात्मक बाबी पुरविण्यावर खास लक्ष दिले आहे. दुसरीकडे सदर महोत्सवामध्ये विविध रंगारंग कार्यक्रमांसह खवय्येगिरी करणाऱ्या पर्यटकांकरिता महाराष्ट्रीयन मेन्यूू चांगल्या पद्धतीने सादर व्हावा यावर सुद्धा विशेष भर देण्यात येणार आहे.

विविध समिती होणार गठित
चिखलदर-मेळघाट पर्यटन महोत्सवादरम्यान देशभरातील येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये, याकरिता जिल्हाधिकारी किरण गित्ते, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात चिखलदऱ्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, नगरसेवक अरुण तायडे, प्रवीण येवतीकर, पालिका व तहसील कर्मचारी यांचेसह स्थानिक व्यावसायिक, हॉटेल ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी, गावकरी यांच्या विविध समिती गठित होणार आहेत.

Web Title: Chikhaldara-Melghat Tourism Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.