चिखलदरा @३७ डिग्री सेल्सिअस; यावर्षीची सर्वाधिक नोंद
By Admin | Updated: May 23, 2015 00:42 IST2015-05-23T00:42:42+5:302015-05-23T00:42:42+5:30
विदर्भाचे एकमेव पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा नंदनवनात शुक्रवारी येथील सिपना महाविद्यालयाच्या तापमान केंद्रावर ३७....

चिखलदरा @३७ डिग्री सेल्सिअस; यावर्षीची सर्वाधिक नोंद
नरेंद्र जावरे चिखलदरा
विदर्भाचे एकमेव पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा नंदनवनात शुक्रवारी येथील सिपना महाविद्यालयाच्या तापमान केंद्रावर ३७ डिग्री सेल्सिअसची नोंद झाली. शहरी भागात तापमानात वाढ झाल्याने त्याचा फटका चिखलदरासारख्या पर्यटन स्थळाला बसला आहे. येथे येणाऱ्या उन्हाळी पर्यटकांची संख्या रोडावत आहे.
चिखलदरा विदर्भाचे एकमेव पर्यटन स्थळ असताना प्रशासनाच्या दुर्लक्षाने होत असलेली वृक्षतोड नंदनववाच्या मुळावर आली आहे. यासह अन्य कारणांमुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदऱ्यातही तापमान वाढत आहे. कधीकाळी उन्हाळ्यातही असणारे हजारो पर्यटकांची गर्दी लुप्त होत आहे. पर्यटन स्थळाचा विकास सिडकोमार्फत होणार असल्याने राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. सिडको अंतर्गत किमान दहा वर्षे लागणार असल्याने तोपर्यंत पर्यटन स्थळाची अवस्था बकाल होण्याची भीती वर्तविली जात आहे.
ओस पडले पर्यटन स्थळ
चिखलदरा पर्यटन स्थळावरील उन्हाळ्यात गत काही वर्षांपर्यंतचे तापमान २८ ते ३२ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेल्याची नोंद आहे. चिखलदरा पर्यटन स्थळासह परिसराला लागून असलेल्या वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. पूर्वी हिरव्या झाडांनी गजबजलेल्या आलाडोह, लवादा, मोथा, शहापूर आदी गावातील शेत जमिनीवर ले-आऊट पडले आहेत. परिणामी ओसाड जमिनी पर्यटकांची निराशा करणाऱ्या ठरत आहेत. या शेतजमिनीवर पूर्णत: वृक्षलागवड करुन चिखलदरा पर्यटन स्थळाला गतवैभव आणण्याची मागणी पर्यटनप्रेमींनी केली आहे.
चिखलदरा पर्यटन विकासासाठी राज्य शासनाला विविध प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. येथे पर्यटकांची संख्या वर्षभर कायम रहावी यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. पिण्याचे पाण्याच्या मुद्यावर लक्ष देणेही महत्त्वाचे आहे.
- राजेंद्रसिंह सोमवंशी,
नगराध्यक्ष, न.प. चिखलदरा.