मुख्यमंत्र्यांची दखल ‘त्या’ उपोषणाची सांगता
By Admin | Updated: December 31, 2016 01:28 IST2016-12-31T01:28:47+5:302016-12-31T01:28:47+5:30
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अन्यायकारक जाचातून मुक्तता मिळण्यासाठी गत तीन दिवसांपासून महिलांचे बेमुदत उपोषण सुरु होते.

मुख्यमंत्र्यांची दखल ‘त्या’ उपोषणाची सांगता
पालकमंत्र्यांचा पुढाकार : मायक्रो फायनान्सवर अंकुश आणणार
अमरावती : मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अन्यायकारक जाचातून मुक्तता मिळण्यासाठी गत तीन दिवसांपासून महिलांचे बेमुदत उपोषण सुरु होते. गुरुवारी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना आंदोलनकर्त्या महिलांनी भेट घेऊन आपबिती कथन केली. ‘मायक्रो’च्या कारभारावर अंकुश आणू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री पालकमंत्र्यांनी त्यांचे बेमुदत उपोषण सोडविले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपोषणाचे आयोजक अ. रहेमान आझाद, संगीता इंगळे, अशोक खरात, अशोक नंदागवळी, विनोद गुलदेवकर, बाळू इंगळे यांनी भेट घेतली. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अन्यायकारक जाचामुळे महिलांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याची कैफियत मांडली. तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. दरम्यान मायक्रो फायनान्स कंपन्यांवर अंकुश लावण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांकडे बेमुदत उपोषण सोडविण्याची जबाबदारी दिली.