मुख्यमंत्री रिप्लाय देतात, तुम्ही का नाही ?
By Admin | Updated: July 31, 2016 23:54 IST2016-07-31T23:54:02+5:302016-07-31T23:54:02+5:30
‘मुख्यमंत्री असो वा विरोधी पक्षनेता कोणीही आमदारांच्या फोनला रिप्लॉय देतात.

मुख्यमंत्री रिप्लाय देतात, तुम्ही का नाही ?
‘सीएस’वर यशोमती ठाकूर उखडल्या : जयश्री दुधेंना हलविले, डॉ. राठींनी घेतले दत्तक
अमरावती : ‘मुख्यमंत्री असो वा विरोधी पक्षनेता कोणीही आमदारांच्या फोनला रिप्लॉय देतात. सीएस साहेब तुम्ही मात्र तीन तासांपासून माझ्या फोनला रिप्लाय का देत नाही? तुम्ही आमदारांचे फोन उचलत नाही तर गोरगरिबांचे काय उचलणार?’ अशा तिखट शब्दांत जिल्हा शल्य चिकित्सकांची कानउघाडणी करुन त्यांच्या कारभारावर आ.यशोमती ठाकूर यांनी थेट बोट ठेवले. रविवारी जिल्हा सामान्य रूग्णालयात हा प्रकार घडला. येथे मागील १५ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या जयश्री दुधे यांना खासगी रुग्णालयात हलविण्यासाठी यशोमतींनी पुढाकार घेतला. डॉ. राठी यांनी जयश्री हिला उपचारासाठी दत्तक घेतले आहे.जयश्री दुधे यांना सासरच्यांनी वर्षभर डांबून ठेवल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले. १५ जुलैपासून त्यांच्यावर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
खासगी रुग्णालयात उपचार सुरू
अमरावती : जयश्री दुधेंच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, यासाठी आ. यशोमती ठाकूर यांनी कमालीची तळमळ दाखविली. येथील खासगी रूग्णालयाचे डॉ. राठी यांनी उपचारासाठी जयश्रीला दत्तक घेतले आहे. त्यानुसार तिला रविवारी येथील खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय झाला. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत जयश्री दुधेंना हलविण्यास नकार देत असल्याचे रूग्णाच्या नातेवाईकांनी आ. यशोमती ठाकूर यांना सांगितले.
त्यानुसार आ.ठाकूर यांनी सीएस राऊत यांच्याशी सातत्याने तीन तास संपर्क साधला. मात्र, सीएस राऊत यांनी आ. यशोमती ठाकूर यांच्या कॉलचे उत्तर दिले नाही. अखेर आ. ठाकूर कामे बाजुला सारून सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास इर्विनमध्ये पोहोचल्या.
तेथील अतिदक्षता विभागात पोहोचून त्यांनी जयश्री दुधे हिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास मनाई का केली जात आहे, हे जाणून घेतले असता सीएस राऊत यांनी जयश्रीला सुटी न देण्याच्या अथवा खासगी दवाखान्यात उपचारासाठी न हलविण्याच्या सूचना दिल्याचे कळले. त्यामुळे कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी अथवा परिचारिकांपैकी कोणीही जयश्री हिला खासगी रूग्णालयात जाऊ देत नव्हते.
अखेर आ. यशोमती ठाकूर यांनी जयश्री दुधे हिला आई-वडिलांच्या स्वाक्षरीसह स्वत:च्या जबाबदारीवर खासगी रुग्णालयात नेत असल्याचे लिहून दिले. त्यानंतर रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान सीएस राऊत हे त्याठिकाणी पोहोचले. सीएस यांना बघताच आ. यशोमती ठाकूर संतापल्या. माझी मुलगी असती तर तिला ईर्विनमध्येच ठेवले असते काय? जयश्री गरीब आहे म्हणून तिला येथेच ठेवता काय? तुम्हाला दुपारी ३ वाजतापासून संपर्क करीत असताना फोन का उचलत नाही. आमदाराने फोन केला उत्तरादाखल किमान मॅसेज टाकायला नको काय, असे म्हणत सीएस राऊत यांना खडेबोल सुनावले. आमदारांचे फोन तर मुख्यमंत्री देखील घेतात, मग, तुम्ही का नाही?, तुम्हाला राजकारण करायचे आहे काय? असे म्हणत आ.यशोमती ठाकूर यांनी सीएस राऊत यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आमदार ठाकूर संतापल्याने सीएस राऊत यांची पाचावर धारण बसली होती. त्यांना काही कळेनासे झाले. अखेर ‘मॅडम, आय अॅम सॉरी’ असे म्हणत, सीएस राऊत यांनी आ. यशोमतींची माफी मागितली. (प्रतिनिधी)
माहूर पोलीस आज घेणार बयाण
जयश्रीच्या सासरचे अर्थात माहूरचे पोलीस सोमवारी अमरावतीत दाखल होणार आहेत. जयश्रीला छळणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध माहूर येथे गुन्हे दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने बयाण घेतले जाईल. सीएसने जयश्रीला खासगी रुग्णालयात हलविण्यासाठी जी टाळाटाळ केली, ती जयश्रीच्या बयाणावर दबाव आणण्यासाठी तर नव्हती ना, असाही चर्चेचा एक सूर जयश्रीच्या नातेवाईकांमध्ये उमटला होता.
तू ऐश्वर्यासारखीच...
जयश्री दुधे हिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर आ. यशोमती मुंबईला रवाना झाल्या. जयश्रीला निरोप देताना त्या म्हणाल्या, ‘आता आपण आठ दिवसांनी भेटू. तू ऐश्वर्या सारखीच दिसतेस. पुढेही तशीच दिसणार. यापुढे तुझ्या भेटीला येताना मला देखील पावडर लावून यावे लागेल’, अशी मस्करी करीत तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
सीएस राऊत यांच्यासोबत सलग तीन तास मोबाईलवरुन संपर्क साधला. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे मी स्वत: इर्विन गाठले. उत्तम इलाजासाठी जयश्रीला खासगी रूग्णालयात हलविले.
- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा
जयश्री दुधे यांना अन्य रुग्णालयात पाठवू नये, अशा आरोग्य संचालकांच्या सूचना होत्या. आरोग्य शिबिरात व्यस्त असल्याने आ. यशोमतींचे फोन घेता आले नाहीत. मात्र, त्या इर्विनमध्ये पोहचल्याचे कळताच मी पोहोचलो.
-अरुण राऊत, सीएस