बेरोजगार युवकाचे लग्नाकरिता मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST2021-01-13T04:32:27+5:302021-01-13T04:32:27+5:30

परतवाडा : वयाची पस्तीशी गाठूनही नोकरीचा शोध कायम असल्याने हताश झालेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकाने लग्न लावून देण्याकरिता एका निवेदनाद्वारे ...

To the Chief Minister for the marriage of an unemployed youth | बेरोजगार युवकाचे लग्नाकरिता मुख्यमंत्र्यांना साकडे

बेरोजगार युवकाचे लग्नाकरिता मुख्यमंत्र्यांना साकडे

परतवाडा : वयाची पस्तीशी गाठूनही नोकरीचा शोध कायम असल्याने हताश झालेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकाने लग्न लावून देण्याकरिता एका निवेदनाद्वारे चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे. एक तर नोकरी (जॉब) द्या, अन्यथा एखाद्या मुलीशी लग्न लावून द्या, अशी मागणी त्याने केली. हताश युवकाचे हे निवेदन समाज माध्यमावर व्हायरल झाले आहे. या निवेदनात आजच्या वस्तुस्थितीला धरून त्या युवकाने जवळजवळ सर्वच सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या व्यथा, भावना व्यक्त केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे.

निवेदनावर अर्जदार म्हणून गजानन राठोड, वाशिम असे नमूद आहे. ‘माझे वय आज ३५ वर्ष झाले असून, आजपर्यंत माझे लग्न झालेले नाही. सात वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. पण, काही ना काही कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. लग्नाच्या अनुषंगाने जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलीवाले - ‘मुलाला नोकरी आहे का?’ असे विचारतात. मुलगा जॉबवर (नोकरीवर) पाहिजे, असे बोलून परत करतात. आपण अजूनपर्यंत नोकरभरती सुरू केलेली नाही. नोकरीच्या जागा काढलेल्या नाहीत. यात जॉब मिळणे कठीण आहे. त्यामुळे आपण मला एक तर जॉब द्यावा, अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करून द्यावे’, असे त्या निवेदनात नमूद आहे.

पत्रात लिहिले वास्तव, युवकांचा प्रतिसाद

निवेदनात नमूद हताशा ही सार्वत्रिक आहे. अनेक वर्षांपासून नोकरभरती नाही. सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शासकीय सेवेतील अनेक पदे रिक्त आहेत. शिक्षित मुलांचे वय वाढत आहे. शिक्षण असूनही नोकरी नसल्यामुळे युवकांमध्ये नैराश्य पसरले आहे. वधुपक्षाला नोकरीवाला विवाहेच्छुक हवा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया निवेदन व्हायरल करणाऱ्यांसह अचलपूर, परतवाड्यातील अनेक बेरोजगार युवकांनी नोंदविल्या आहेत.

Web Title: To the Chief Minister for the marriage of an unemployed youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.