पालकमंत्र्यांच्या कल्पकतेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
By Admin | Updated: June 20, 2016 00:09 IST2016-06-20T00:09:30+5:302016-06-20T00:09:30+5:30
राज्यमंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी संकलित केलेल्या शासनाच्या विविध योजनांची परिपूर्ण माहिती असलेल्या....

पालकमंत्र्यांच्या कल्पकतेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
गुरुकिल्ली विकासाची : मार्गदर्शिका शासकीय योजनांची
अमरावती : राज्यमंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी संकलित केलेल्या शासनाच्या विविध योजनांची परिपूर्ण माहिती असलेल्या ‘गुरूकिल्ली विकासाची, मार्गदर्शिका शासकीय योजनांची’ या पुस्तकाचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे रविवारी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत करण्यात आले.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी तयार केलेल्या विविध शासकीय योजनांच्या माहितीची ही पुस्तिका जनतेला विविध योजनांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. शासन गोरगरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून पालकमंत्री पोटे यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या पुस्तिकेमध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती असून शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी ही पुस्तिका अतिशय बहुमोल आहे. ही पुस्तिका ग्रामपंचायत कार्यालयात व सार्वजनिक ग्रंथालयातदेखील ‘संदर्भग्रंथ’ म्हणून एक प्रत लवकरच उपलब्ध होणार आहे. विविध विभागांकडून योजनांची माहिती संकलित करून ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. पुस्तकाचे विमोचन करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, खा.नाना पटोले, गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)