अमरावती : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता गावा गावात राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण होणार ? याबाबतच्या चर्चानी ग्रामीण भागात चांगलाच जोर पकडला आहे विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल एकदाचा लागून सहा दिवस लोटून गेले. मात्र, या निकालात भाजपला भरभरून मतदारांनी मतेही दिली. मात्र, कुठल्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. परिणामी सर्वाधिक संख्या असलेल्या भाजपला सत्तेसाठी लागणारा मॅजीक आकडा पूर्ण करण्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. हे राजकीय समीकरण सर्वश्रूत आहे. मात्र नव्या सरकारमध्ये भावी मुख्यमंत्री कोण ? याची उत्सुकता सर्वसामान्यांनाही लागली आहे. नेमके याच विषयावर गावा गावात आता चर्चा रंगू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत मागील २५ वर्षापर्यंत युती असलेले भाजप, शिवसेना आणि १५ वर्षांपासून आघाडी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे राजकीय पक्ष पहिल्यांदाच एवढ्या वर्षांचा घरोबा तोडून वेगवेगळे ऐकमेकांविरोधात लढले. या लढतीत मतदारांनी आपल्या मताचा कौल सर्वाधिक भाजपाच्या पारड्यात टाकला. तर त्यापाठोपाठ शिवसेनला, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आणि कॉंग्रेस या पक्षांना आपल्या मताची मतदारांनी पसंती मतदान रूपाने दिली आहे. मतदारांनी मात्र हा कौल देताना स्पष्ट बहूमत कुठल्याही पक्षाच्या बाजूने दिले नाही. परिणामी सत्तास्थापनेसाठी भाजप हा पक्ष प्रमुख दावेदार आहे. विधानसभेचा निकाल जाहीर होऊन जवळपास सहा दिवसांचा कालावधी लोटून गेला आहे. अशातच ऐन सत्ता स्थापनेच्या कालावधीतच दिवाळी सण आल्याने यासाठी होणाऱ्या राजकीय उलथापालथही थंडावल्या आहेत.मात्र हे सर्व बरोबर असले तरी भाजपाच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये भावी मुख्यमंत्री कोण? गडकरी की फडणविस याबाबतच्या चर्चा गावा गावात सुरू झाल्या आहेत. भाजपा कुणाला मुख्यमंत्री म्हणून निवडणार याबाबतही वरील दोन विदर्भातील नेत्यांबाबत चर्चे दरम्यान व्यक्ती महत्वावरही आप-आपली मते मांडून आपल्यासोबत गप्पा करणाऱ्या इतर चार चौघांना पटवून देत असल्याचेही गावा गावातील चौकाचौकात , ओट्यावर चालणाऱ्या गप्पाच्या फडावर दिसून आल्या. अशावेळी रस्त्याने जाणारा एखादा गावातील पुढाऱ्यांनाही गाव गप्पा करणारे आवर्जुन विचारत ‘का रे, बा कोण होईल मुख्यमंत्री?’ याबाबत अशा व्यक्तीचीही मते मात्र जाणून घेतली जात आहे . एकंदरीत राज्याच्या भावी मुख्यमंत्र्याचे वेध राजकारण्याशिवाय सर्वसामान्यांना लागल्याचे यावरून दिसून येते.
ेगावागावांत रंगू लागल्या भावी मुख्यमंत्र्याच्या गप्पा
By admin | Updated: October 25, 2014 02:03 IST