महापालिका आयुक्तांना पत्र : बबलू शेखावत, अविनाश मार्डीकर यांची मागणीअमरावती : गेल्या तीन वर्षांत महापालिकेने शहरात नगरोत्थान आणि रस्ते दुरुस्तीच्या शिर्ष्यातंर्गत ४० ते ५० कोटी रुपयांची कामे केली आहेत. ही विकास कामे नागरिकांच्या हितासाठी करण्यात आली असून रस्ते, नाल्यांच्या कामात गुणवत्ता नसेल तर या कामांची तपासणी करुन संबधित अधिकारी, कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत, अविनाश मार्डीकर यांनी केली आहे, असे पत्र आयुक्त अरुण डोंगरे यांना दिले आहे.अनुदानातून झालेल्या विकास कामांचा दर्जा योग्य नसेल तर या कामात वापरण्यात आलेल्या बांधकाम साहित्याचा दर्जा संबधित यंत्रणेमार्फत तपासून अभियंता, कंत्राटदारांवर कारवाई व्हावी, असे आमसभेत बबलू शेखावत म्हणाले. विकास कामे निकृष्ट दर्जाचे असेल तर अधिकारी देयकांवर स्वाक्षरी कशी करतात? या विषयी चौकशी करावी, असे शेखावत, मार्डीकर यांचे म्हणणे आहे. शासन अनुदानातून झालेल्या विकास कामांची चौकशी क्वॉलिटी कंट्रोल मार्फत तपासून ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झाले पाहिजे, असे बबलू शेखावत यांचे म्हणणे आहे. विकास कामे सुचविणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. तथापि ही कामे चांगल्या दर्जाची व्हावीत, यासाठी अभियंत्यांची जबाबदारी आहे. गोपाल नगर ते मिनी बायपास या रस्त्याचे निर्माण कार्य नियम गुंडाळून करण्यात आले. या रस्त्याच्या निर्मितीचा दर्जा काहीच नाही. त्यामुळे साहित्य तपासणीचे कार्य युद्धस्तरावर राबवून यात दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एकुणच शासन अनुदानातील कामांचा दर्जा तपासून जे दोषी असतील त्यांना कठोर शासन झालेच पाहिजे, कंत्राटदारांवर कारवाई करुन त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
५० कोटी रुपयांच्या कामांची तपासणी कराच!
By admin | Updated: December 21, 2014 22:51 IST