बडनेरा रेल्वे स्थानकाला भिक्षेकऱ्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:15 IST2018-03-04T22:15:34+5:302018-03-04T22:15:34+5:30
जंक्शन म्हणून ओळख असणाऱ्या बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलांवर भीक मागणाऱ्यांची मोठी गर्दी दररोज असते. पुलावर अगदी मध्ये बसून काही भिकारी भीक मागतात.

बडनेरा रेल्वे स्थानकाला भिक्षेकऱ्यांचा विळखा
आॅनलाईन लोकमत
बडनेरा : जंक्शन म्हणून ओळख असणाऱ्या बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलांवर भीक मागणाऱ्यांची मोठी गर्दी दररोज असते. पुलावर अगदी मध्ये बसून काही भिकारी भीक मागतात. काही जण दादागिरीही करतात. प्रशासनाने रेल्वे स्थानकाची त्यांच्या विळख्यातून सुटका करावी, अशी प्रवासी वर्गामधून मागणी उमटत आहे.
बडनेरा रेल्वे स्थानकाहून दिवसभरात ४० ते ४५ प्रवासी गाड्या ये-जा करतात. त्यामधून मोठ्या संख्येत प्रवाशी वर्ग उतरतात व चढतात. ही संख्या पाहता भिकाऱ्यांनी आपल्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी रेल्वे स्थानकावर भीक मागणे सुरू केले. यापैकी बरेच भिकारी शरीरयष्टीने धडधाकट आहेत. तेदेखील भीक मागताना दृष्टीस पडतात. भीक मागणाऱ्यांची संख्या बरीच झाली आहे. पादचारी पुलाच्या मधोमध बसून ते भीक मागतात, आपआपसात भांडतात, शिवीगाळही करतात. रेल्वे स्थानकावरच मद्यप्राशन करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. प्रवासी वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे.
रेल्वे स्थानकावरील जुना पादचारी पुल अरुंद आहे. त्यावर ठिकठिकाणी भिकारी झोपलेले आढळून येतात. त्यामुळे प्रवाशांना येथून ये-जा करणे अडचणीचे ठरत आहे. मोक्याची जागा भीक मागण्यासाठी मलाच मिळावी, यासाठी भिकाऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे चित्र आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे कळकळीने प्रवासी वर्गामध्ये बोलले जात आहे.
भिकाऱ्यांच्या वास्तव्याने अस्वच्छता
बडनेरा रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल असोत वा प्लॅटफार्मबाहेरील परिसर, ठिकठिकाणी भिकारी भीक मागत नजरेस पडतात. त्यांच्याकडील उरलेले अन्न, पाण्याच्या गोळा केलेल्या बाटल्या, कपडे ते वाट्टेल तिथे टाकून देतात. त्यामुळे रेल्वे स्थानकाचा परिसर अस्वच्छ राहत असून, पर्यायाने परिसर स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांवर कामाचा ताणदेखील वाढतो आहे
भिकाऱ्यांची दादागिरी
बडनेरा रेल्वे स्थानकावरील अनेक भिकारी दारू पित असल्याचे चित्र आहे. दारू पिल्यानंतर ते एकमेकांमध्ये शिवीगाळ करतात. काही भिकारी अर्धनग्न असतात. रेल्वे पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, असे बोलले जात आहे.