घरच्या घरी तपासा बियाण्यांंची उगवणशक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:07+5:30
घरच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर सोयाबीन बाहेर काढा. सर्व पोत्यांतील काढलेले धान्य एकत्र करून घ्या. त्यानंतर गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे स्वच्छ धुवून जमिनीवर पसरवा आणि काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेमी अंतरावर ओळीत ठेवून तीन नमुने तयार करा. बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी टाका.

घरच्या घरी तपासा बियाण्यांंची उगवणशक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसला/शेंदूरजनाघाट : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन बियाणे उगवण तपासणीची सोपी पद्धत कृषी विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवणक्षमता घरच्या घरी तपासावी, असे आवाहन करण्यात आली आहे.
घरच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर सोयाबीन बाहेर काढा. सर्व पोत्यांतील काढलेले धान्य एकत्र करून घ्या. त्यानंतर गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे स्वच्छ धुवून जमिनीवर पसरवा आणि काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेमी अंतरावर ओळीत ठेवून तीन नमुने तयार करा. बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी टाका. त्याची गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा आणि अधूनमधून पाणी शिंपडून ओले ठेवा. ६-७ दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरून उघडा. तिन्ही गुंडाळीतील ७० वा त्यापेक्षा जास्त दाण्याला कोंब असल्यास हे बियाणे दर्जेदार आहे. १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम रायझोबीयम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करून सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी प्रति तीन किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशीपासून संरक्षणासाठी प्रक्रिया करावी, असे वरूड तालुका कृषी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अशी करा पेरणी
उगवण झालेल्या बियाण्यांची टक्केवारी ७० पेक्षा कमी असल्यास एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी. ७० टक्क््यांपेक्षा कमी बियाणे उगवले असेल, तर त्या प्रमाणात बियाण्यांची मात्रा जास्त वाढविल्यास बाजारातील बियाण्याएवढीच रोपाची संख्या राहून अपेक्षित उत्पादन येते. ७० टक्के व त्यापेक्षा जास्त उगवण शक्ती असल्यास एकरी ३० किलो बियाणे वापरावे. ६५ ते ६९ टक्के उगवण शक्ती असल्यास एकरी ३२.५ किलो बियाणे वापरावे. ६० ते ६४ टक्के उगवण शक्ती असल्यास एकरी ३५ किलो बियाणे वापरावे. ५० टक्के पेक्षा कमी उगवण असल्यास घरचे बियाणे न वापरता प्रमाणित बियाणे खरेदी करावे.