पालकमंत्र्यांच्या पत्राच्या आधारावर फसवणूक
By Admin | Updated: September 12, 2015 00:17 IST2015-09-12T00:17:50+5:302015-09-12T00:17:50+5:30
तालुक्यातील लोकांची फसवेगिरी करणाऱ्या तीन आरोपींपैकी स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणाऱ्याने जिल्हा पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य ...

पालकमंत्र्यांच्या पत्राच्या आधारावर फसवणूक
मोर्शी तालुक्यात गोरखधंदा : म्हणतात, जिल्हा उद्योग केंद्रातून कर्ज देतो
लोकमत विशेष
रोहितप्रसाद तिवारी ल्ल मोर्शी
तालुक्यातील लोकांची फसवेगिरी करणाऱ्या तीन आरोपींपैकी स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणाऱ्याने जिल्हा पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांचे पत्र घेऊन जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांवर दडपण आणले. या पत्राच्या आधारावर आरोपी आणखी लोकांची फसवणूक करणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोर्शी तालुक्यातील लोकांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज मिळवून देण्याच्या, शासकीय जमिनी प्राप्त करून देण्यांच्या आणि इतर शासकीय लाभ प्राप्त करून देण्याच्या नावावर लोकांकडून हजारो रुपये उकळून फसवेगिरी करण्याचा प्रकार कथितरीत्या स्वत:ची ओळख पत्रकार म्हणून करवून देणाऱ्या वाघमारे, जिप शिक्षिका शीला धांडे आणि सारिका पेठे या तीन आरोपींनी केली. या प्रकरणी या तिघांवर मोर्शी पोलिसांनी गुन्हे नोंदविले असून तपास सुरू आहे. याप्रकरणी 'मोर्शीत तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल' या मथळ्याखाली ८ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले आहे.
या त्रिकुटांनी लोकांची फसवणूक करताना जिल्हा उद्योग केंद्राचे कर्ज मागणी अर्ज लोकांकडून भरुन घेतले. लाभ प्राप्त करून देण्याच्या नावाखाली लोकांकडून मोठी रक्कम वसूल केली. जिल्हा उद्योग केंद्राकडे आरोपींपैकी वाघमारे याने एकूण ६५ लोकांचे कर्ज मागणी अर्ज सादर करण्याचा प्रयत्न केला. तथापि जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्जाची प्रकरणे विहीत कार्यपध्दतीने येतात. त्यात कर्ज मागणीदाराकडे संबंधित अधिकारी भेटी देतात. तपासणी करतात आणि त्यांच्या शिफारशीनंतरच कर्ज मागणी अर्ज जिल्हा उद्योग केंद्रात सादर होत असते. त्यामुळे आरोपी वाघमारे याच्याकडून जिल्हा उद्योग केंद्राने ६५ अर्ज स्वीकृत केले नव्हते आणि त्याला परत पाठविले होते.
वाघमारे याने थेट जिल्हा पालक मंत्र्याचे कार्यालय गाठले आणि विशेष कार्य अधिकारी यांच्याकडून 'महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग महामंडळ’ या नावाने १ मार्च २०१५ रोजी पत्र प्राप्त करवून घेतले. त्यात ‘निवेदन आवश्यक कार्यवाहीकरिता आपले कार्यालयास पाठविण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. थेट जिल्हा पालकमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचे पत्र पाहून शेवटी जिल्हा उद्योग केंद्राने दडपणाखाली येऊन ६५ लोकांचे कर्ज मागणी अर्ज वाघमारे यांच्याकडून स्वीकृत करवून घेतले आहे. मागील सहा महिन लोटून गेल्यावरही कर्जाची प्रकरणे मंजूर झाली नाहीत, हे पाहता फसवणूक झालेल्यांनी पैसे परत मागण्याचा तगादा लावला असता आरोपी त्यांना जिल्हा पालक मंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी यांचे १ मार्च चे पत्र दाखवून कर्ज आज ना उद्या मिळणार असल्याची बतावणी करीत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान याच पत्राच्या आधारे आरोपी मंडळी इतरांचीही फसवणूक करणार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.