धर्मादाय आयुक्त घेणार का दखल ?
By Admin | Updated: October 27, 2015 00:13 IST2015-10-27T00:13:03+5:302015-10-27T00:13:03+5:30
अंबा व एकवीरा देवी संस्थानातर्फे पत्रिका वाटून निमंत्रितांनाच महाप्रसादाकरिता बोलविण्यात आल्याने हजारो नागरिक वंचित राहिलेत.

धर्मादाय आयुक्त घेणार का दखल ?
नागरिकांची मागणी : अंबा, एकवीरेचा महाप्रसाद व्हावा सर्वांसाठी खुला
अमरावती : अंबा व एकवीरा देवी संस्थानातर्फे पत्रिका वाटून निमंत्रितांनाच महाप्रसादाकरिता बोलविण्यात आल्याने हजारो नागरिक वंचित राहिलेत. हा सर्रास भेदभाव असून धार्मिक स्थळांच्या उद्देशपूर्तीकडे आता धर्मदाय आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी भक्तांची मागणी आहे.
देव हा सर्वासाठी सारखाच आहे. मग, महाप्रसादासाठी भेदभाव का? असा सवाल अमरावतीकरांनी उपस्थित केला आहे. सोमवारी अंबादेवी, एकवीरा देवी संस्थानतर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, विश्वस्तांनी मोजक्याच लोकांना निमंत्रण देऊन बंदद्वार महाप्रसाद दिला. त्यामुळे हजारो भाविक यापासून वंचित राहिले आहेत. अनेक भाविकांना प्रवेशद्वारापासून अक्षरश: पिटाळून लावण्याचा अश्लाघ्य प्रकार देखील यावेळी दिसून आला.
त्यामुळे विश्वस्तांची मनमानी किती वाढली आहे, हे स्पष्ट झाले. महाप्रसादाची अपेक्षा घेऊन आलेल्या हजारो भाविकांना अंबादेवी व एकवीरा देवी मंदिरातून महाप्रसाद न घेताच परतावे लागले. ‘अंबा -एकवीरे’च्या महाप्रसादात भेदभाव का? या मथळ्याखाली 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच शहरात खळबळ उडाली. या वृत्ताचे हजारो सामान्य भक्तांनी समर्थन केले.
चौकशीची मागणी
अमरावती : धार्मिक स्थळांच्या उद्देशपूर्तीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी भक्तांनी केली आहे. धार्मिक स्थळे ही सर्वासाठीच खुली असतात, असावीत. दर्शनाप्रमाणेच महाप्रसादाचाही लाभ सर्व भाविकांना मिळायला हवा, अशी मागणी आता जोर धरत आहे. धार्मिक स्थळांना धर्मदाय आयुक्त कार्यालयाने काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमांची उद्देशपूर्ती करण्याचे काम संस्थानचे आहे. आता धर्मदाय आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
शहरातील मोठमोठ्या धार्मिक स्थळांमध्ये विश्वस्तांची मनमानी सुरू आहे. भिकारी देवस्थानांसमोर बसणार नाहीत, तर कुठे जाणार? संस्थानचालक देवस्थानमाफिया बनले आहेत. त्यांची चौकशी व्हावी.
- अविनाश ढगे,
माजी व्यवस्थापक, साईबाबा ट्रस्ट.