माऊलीचे अश्व ठरणार बहिरमचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:02 IST2018-01-06T23:02:04+5:302018-01-06T23:02:54+5:30
आषाढी एकादशीला पंढरपूरजवळील वाखरी येथील सोहळ्यात माउलीचे अश्व रिंगण घालतात. माउलीचे तेच अश्व रविवारी बहिरमबुवांच्या चरणी येणार आहेत.

माऊलीचे अश्व ठरणार बहिरमचे आकर्षण
वीरेंद्रकुमार जोगी।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : आषाढी एकादशीला पंढरपूरजवळील वाखरी येथील सोहळ्यात माउलीचे अश्व रिंगण घालतात. माउलीचे तेच अश्व रविवारी बहिरमबुवांच्या चरणी येणार आहेत. यंदा प्रथमच बहिरम येथे रिंगण सोहळा आयोजित असून, या सोहळ्याविषयी कमालीची उत्सुकता पंचक्रोशीत आहे.
विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेली बहिरम यात्रा रंगात आली आहे. रविवारी यात्रा बहरात येणार आहे. प्रथमच होणारा हा रिंगण सोहळा वाखरी पंढरपूरच्या धर्तीवर होणार आहे. यात्रेतील शंकरपटाच्या जागेवर दुपारी दोन वाजता या रिंगण सोहळ्याकरिता पाच एकर जागा तयार करण्यात आली आहे. या रिंगण सोहळयात पंढरपूरचे दोन अश्व, चोपदार आणि बिगर चोपदारसह हजारो वारकरी आणि ३० ते ४० पालखी, दिंड्या रिंगण सोहळ्यात सहभागी होत आहेत. येथे ६ ते १३ जानेवरी दरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे. यंदाच्या यात्रेसाठी दुकानदारांनी चढ्या बोलीने लिलावात जागा घेतल्या. याला फूलविक्रीची दुकाने अपवाद ठरली. त्यांना अन्य विक्री करता येणार नाही, असे आयोजकांनी सांगितले.
कर्नाटकच्या शिंतोळे सरकारचे अश्व
विठ्ठलाची वारी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असताना एकादशीच्या आदल्या दिवशी वाखरी येथे माउलीचा रिंगण सोहळा रंगतो. या रिंगणात धावणारे माऊलीचे अश्व कर्नाटकच्या शिंतोळे सरकार यांचे मालकीचे आहेत. बहिरमच्या यात्रेत हेच माउलीचे अश्व राहणार आहेत. रविवारी सकाळी ते बहिरममध्ये पोहचतील. या यात्रेत हे अश्व प्रथमच येणार असल्याने यात्रेला आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रबोधनाची परंपरा
बहिरम यात्रेला प्रबोधनाची प्रदीर्घ परंपरा आहे. येथे यात्रा कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा व भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख आदींनी प्रबोधन केले. राष्ट्रसंत व गाडगेबाबा यांनी या बहिरम यात्रेत लोकजागृती केलेली आहे.
मातीची भांडी आकर्षण
ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी यात्रेची ओळख होती. आता या यात्रेचे स्वरूप बदललले असले तरी ग्रामीण आणि शहरी संस्कृतीला आजही ती हवीहवीशी वाटते. मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील झल्लार गावातील व्यापारी मातीची भांडी विक्रीला आणतात. ही मातीची भांडी यात्रेचे आकर्षण आहे.