बलात्कारी शिक्षकाला न्यायालय परिसरात चोप
By Admin | Updated: September 17, 2016 00:17 IST2016-09-17T00:17:31+5:302016-09-17T00:17:31+5:30
मूकबधिर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला खोलापुरी गेट पोलिसांनी गुरूवारी रात्री अटक केली आहे.

बलात्कारी शिक्षकाला न्यायालय परिसरात चोप
खोलापुरी गेट परिसरातील घटना : आरोपीला एक दिवसाची कोठडी
अमरावती : मूकबधिर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला खोलापुरी गेट पोलिसांनी गुरूवारी रात्री अटक केली आहे. दीपक भाऊराव उघडे (४४,रा.पोटे टाऊनशिप) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात आणले असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांसह काही संतप्त नागरिकांनी आरोपीला न्यायालयात परिसरातच चोप दिला.
खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील मूकबधिर मुला-मुलींच्या शाळेत शिकणारी एक सातवर्षीय विद्यार्थिनी गुरूवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. गणेश विसर्जनामुुळे शाळेत दोन ते तीनच विद्यार्थी उपस्थित होते. शाळेत शुकशुकाट असल्याची संधी हेरून आरोपी दीपकने त्या विद्यार्थिनीला प्रसाधनगृहात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. विद्यार्थिनीने घरी जाऊन ही बाब सांकेतिक भाषेत आईला सांगितली. त्यांनी तत्काळ खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठून आरोपी शिक्षक दीपक उघडेविरूद्ध तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३७६ (क), पॉक्सो ८, १०, १२ नुुसार गुन्हा नोंदविला. प्रकरणाचे गांभीर्य बघता पोलिसांनी तत्काळ पोटे टाऊनशिपमध्ये जाऊन आरोपी शिक्षकाला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्याकरिता आणण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष बद्रे, प्रवीण डांगे, संजय गव्हारे, धीरज आठवले, बच्चू रेडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त करीत आरोपीला चोप दिला. या घटनेमुळे न्यायालयात परिसरात गोंधळ उडाला होता. पोलिसांनी तणावाची स्थिती हाताळत आरोपीला न्यायालयात हजर केले आणि चोख बंदोबस्तात परत ठाण्यात नेले. (प्रतिनिधी)