फरकाचे ‘ते’ शुल्क मोजावे लागणार
By Admin | Updated: January 14, 2017 00:10 IST2017-01-14T00:10:04+5:302017-01-14T00:10:04+5:30
प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वाहन नोंदणी, परवाना नुतनीकरणाच्या धोरणात केंद्र शासनाने बदल केला आहे.

फरकाचे ‘ते’ शुल्क मोजावे लागणार
नवा निर्णय : नोंदणी, नूतनीकरणाचा समावेश
अमरावती : प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वाहन नोंदणी, परवाना नुतनीकरणाच्या धोरणात केंद्र शासनाने बदल केला आहे. त्याअनुषंगाने २९ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ या आठ दिवसांतील आरटीओत झालेल्या विविध कामांच्या फरकाचे शुल्क वाहनधारकांना मोजावे लागणार आहे.
केंद्रीय भूपृष्ठ व दळणवळण मंत्रालयाने २९ डिसेंबर २०१६ च्या अधिसूचनेनुसार केंद्रीय मोटारवाहन नियम १९८९ मध्ये सुधारणा करून नवीन मोटारवाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहनांवर कर्जाच्या बोझ्याची नोंद घेणे, उशिरा वाहन हस्तांतरण, तात्पुरती कायम अनुज्ञप्ती काढणे, अनुज्ञप्तीचे नूतनीकरण करणे, अनुज्ञप्तीवर नवीन संवर्गाची नोंद घेणे, वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले असेल व इतर विविध कामकाजाची २९ डिसेंबरपासून शुल्कवाढ केली आहे. ज्या मोटर वाहन अनुज्ञप्ती धारकांनी २९ डिसेंबर ते ६ जानेवारी २०१७ या कालावधीत जुन्या दराने शुल्काची आकारणी केलेल्या वाहनधारकांनी वाहन नोंदणीकरीता, अनुज्ञप्ती नूतनीकरणाकरिता तसेच नवीन अनुज्ञप्तीकरिता अर्ज केले आहेत. याशिवाय वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण केले असेल किंवा इतर कारणास्तव कार्यालयात सादर केले असतील त्यांना शुल्कातील फरकाची रक्कम भरावी लागणार असून त्याशिवाय त्यांनी सादर केलेले विविध कामांचे अर्ज निकाली काढण्यात येणार नाहीत.
यासाठी विहित वेळेत वाहनांची कागदपत्रे अनुज्ञप्तीप्राप्त करून घेण्यासाठी वाजवी शुल्काची रक्कम भरावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.