अधिकाऱ्याला चोप, पोलिसांच्या हवाली
By Admin | Updated: March 25, 2015 00:09 IST2015-03-25T00:09:11+5:302015-03-25T00:09:11+5:30
शहरातील दुकानदारांना धमकावून वसुली करणाऱ्या वैधमापन निरीक्षकाला एका दुकानदाराने चांगलाच चोप दिल्याची घटना घडली.

अधिकाऱ्याला चोप, पोलिसांच्या हवाली
वरुड : शहरातील दुकानदारांना धमकावून वसुली करणाऱ्या वैधमापन निरीक्षकाला एका दुकानदाराने चांगलाच चोप दिल्याची घटना घडली. संतप्त व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात नेवून कारवाईची मागणी केली. व्यापारी संघटनेच्या वतीने सदर अधिकाऱ्या विरुद्ध तक्रार देण्यात आली.
मोर्शी उपविभागाचे वैधवजनमापे तपासणी खात्याचे अधिकारी विजय पतेसिंह बनाफर यांनी मार्च महिन्यात पठाणी वसुली सुरु केली होती. त्यांनी शहरात गत वर्षापासून दुकानदारांना धमकावून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू केला होता. विनाकारणच्या भानगडीला सामोरे न जाता मुकाटयाने जे मागेल ते दुकानदारांनी आतापर्यंत दिले. परंतु मागणी सतत वाढत असल्याने मंगळवारी दुपारी ४ वाजतादरम्यान पांढुर्णा चौक परिसरातील एका दुकानदाराने या निरीक्षकाला भर चौकात चांगलेच बदडले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून सदर अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात आणले. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तसेच शहरातील सर्व दुकानदारांनी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती. वरुडात कंटाळलेल्या दुकानदारांनी भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला धडा शिकविण्यासाठी चक्क चोप दिल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी कारवाई केलेली नव्हती. वरुड तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक वानखडे, माजी अध्यक्ष जगदीश उपाध्याय, गिरीधर देशमुख, विनय चौधरी, जितू शहा, संदीप तरार, आनंद खेरडे, भ्रष्टाचार निर्मूलनचे लोकेश अग्रवाल यांच्यासह ५० व्यापाऱ्यांच्या व सहीने तक्रार करण्यात आली.