दयाराम काळे मोर्शी पंचायत समितीचे प्रभारी सभापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST2021-03-09T04:16:22+5:302021-03-09T04:16:22+5:30
अमरावती : मोर्शी पंचायत समितीचे सभापती यादवराव चोपडे आणि उपसभापती माया वानखडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा एकाचवेळी दिला. ...

दयाराम काळे मोर्शी पंचायत समितीचे प्रभारी सभापती
अमरावती : मोर्शी पंचायत समितीचे सभापती यादवराव चोपडे आणि उपसभापती माया वानखडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा एकाचवेळी दिला. या रिक्त पदावर नवीन सभापतींची निवड होईपर्यंत सोमवारी सीईओंच्या दालनात काढण्यात आलेल्या ईश्र्वरचिठ्ठीत झेडपीचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे यांची नियुक्ती प्रभारी सभापती म्हणून करण्यात आली.
१० सदस्य असलेल्या मोर्शी पंचायत समितीत भाजपचे ६, शिवसेनेचे २ आणि काँग्रेस व भाकपचा प्रत्येकी १ याप्रमाणे पक्षीय बलाबल आहे. भाजपच्या अंतर्गत करारानुसार विद्यमान सभापती यादवराव चोपडे व उपसभापती माया वानखडे यांना प्रत्येक सव्वा वर्षासाठी ही पदे देण्यात आली होती. अंतर्गत करारानुसार गत फेब्रुवारी महिन्यात या पदाधिकाऱ्याचा ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानुसार उपसभापती वानखडे यांनी पदाचा राजीनामा सभापतीकडे, तर सभापतींनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे दिला. हे दोन्ही राजीनामे मंजूर करण्यात आले आहे.
दरम्यान पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांनी आपल्या पदाचा राजीनामा एकाचवेळी दिल्यास झेडपी अधिनियमातील तरतुदीनुसार सीईओंनी संबंधित पंचायत समितीचे कामकाज पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीमधून हा पदभार सोपविण्याचे अधिकार सीईओंना आहेत. त्यानुसार ८ मार्च रोजी सीईओंनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, समाजकल्याण सभापती, दयाराम काळे,आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा आमले अशा चौघांच्या ईश्र्वर चिठ्या टाकून सभापती पदाकरिता सोडत काढली. यात झेडपी समाजकल्याण सभापती दयाराम काळे यांनी मोर्शी पंचायत प्रभारी समितीचे सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे.
कोट
मोर्शी पंचायत समितीचे सभापती व उपसभापती अशा दोन्ही पदाचे राजीनामे एकाच
वेळी दिले आहेत. त्यामुळे नवीन निवडणूक होईपर्यंत झेडपी अधिनियमातील तरतुदीनुसार झेडपी सभापतीमधून प्रभार देण्याची तरतूद आहे. त्यानुसार काळे यांचे प्रभारी सभापती म्हणून ईश्र्वरचिठ्ठीने निवड केली आहे.
- अमोल येडगे,
मुख्यकार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद