चांदूररेल्वेत सत्तापक्ष नगरसेवकांचा मुख्याधिकारी विरोधात ठिय्या
By Admin | Updated: July 28, 2016 00:04 IST2016-07-28T00:04:03+5:302016-07-28T00:04:03+5:30
नगरपरिषदेत सत्तापक्ष असलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी बुधवारी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले.

चांदूररेल्वेत सत्तापक्ष नगरसेवकांचा मुख्याधिकारी विरोधात ठिय्या
प्रवेशद्वाराला कुलूप : कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
चांदूररेल्वे: नगरपरिषदेत सत्तापक्ष असलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी बुधवारी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. मालमत्ता कर वसुलीच्या मुद्द्यावरुन मुख्याधिकारी विरुद्ध नगरसेवक असा वाद झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्या कारभाराविरोधात सतत आंदोलन का होतात? नगराध्यक्षांना मुख्याधिकारी का जुमानत नाही, याचे चिंतन काँग्रेसने करावे, असा सूर आहे.
बुधवारी सत्तापक्षाचे नगरसेवक बच्चू पानरे, बंडू आठवले, प्रदीप वाघ व भाजपाचे नगरसेवक सचिन जयस्वाल यांनी समर्थकांसह नगराध्यक्ष अभिजित सराड यांच्याकडे मालमत्ता कराचा विषय मांडला. सहकारी नगरसेवकांच्या व्यथा मांडण्यासाठी नगराध्यक्ष सराड हे मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्याकडे गेलेत. मुख्याधिकारी ठाकरे यांनी मात्र नगरसेवकांच्या या मागणीला बगल देत सन २०१५ ते २०१६ या सत्राचा घराचे मालमत्ता कर ज्या नागरिकांनी भरले आहे, अशानाच रहिवाशी दाखला देत असल्याचे सांगितले. शासनाच्या धोरणानुसार १०० टक्के कर वसूल केली जाते.. तसेच शैक्षणिक कामाकरीता दाखले देणे सुरु आहे. मात्र, वैयक्तिक कामासाठी दाखले पाहिजे असल्यास सदर नागरिकाने ५० टक्के कराचा भरणा करणे अनिवार्य असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या उत्तरावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही. दरम्यान नगराध्यक्ष अभिजित सराड यांनी मुख्याधिकाऱ्यांना मागणीचे पत्र दिले. नगरसेवक एवढ्यावर थांबले नाहीत. नगरपरिषदेच्या दोन्ही प्रवेशद्वाला कुलूप ठोकले. मुख्याधिकाऱ्यांच्या कारभारावर विरोधात नारेबाजी केली. तर कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन करुन घटनेचा निषेध केला.