चांदूरबाजार बाजार समिती झाली जुगाराचा अड्डा
By Admin | Updated: June 1, 2016 00:54 IST2016-06-01T00:54:11+5:302016-06-01T00:54:11+5:30
स्थानिक बाजार समिती परिसरातील बैल बाजाराकडील जुगार मोठ्या गेटच्या बाजूला बाभळीच्या झाडाखाली मागील काही दिवसांपासून डब्बा जुगार खेळल्या जातो.

चांदूरबाजार बाजार समिती झाली जुगाराचा अड्डा
पोलिसांचे दुर्लक्ष : शेतकरी पडतात ‘डब्बा’ जुगाराला बळी
सुमित हरकुट चांदूरबाजार
स्थानिक बाजार समिती परिसरातील बैल बाजाराकडील जुगार मोठ्या गेटच्या बाजूला बाभळीच्या झाडाखाली मागील काही दिवसांपासून डब्बा जुगार खेळल्या जातो. या जुगारात बळी पडतात. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तसेच बाजार समितीप्रशासनही या प्रकारापासून अनभिन्न असल्याचे दिसते.
२९ मे रोजी एका शेतकऱ्याने आपल्या बकऱ्या विकल्या त्याला त्या मोबदल्यात त्याची रक्कम मिळाली. शेतकऱ्यांच्या हाती रक्कम पडताच हा डब्बा जुगार भरविणाऱ्या चौकडीने आपले सावज म्हणून घेरले व तेथील बैलबाजार बाजूस बाभळीच्या झाडाखाली जुगार भरविला व तीन पत्त्याचा हेरफेर करून जुगार सुरू झाला. या हेरफेरीदरम्यान त्याचा तीन साथीदारांनी त्या ३ पत्त्यावर आपले पैसे लावले. हे सर्व करीत असताना जुगार चौकडीतील एक व्यक्ती पैसे असलेल्या या शेतकऱ्याकडे पूर्णत: लक्ष ठेवून होता.
या पत्ताच्या हेरफेरीवर संबंधित शेतकरी उत्सुकतेपोटी खेळाची प्रक्रिया न्याहाळत होता. अशातच जुगार भरविणाऱ्यांचा साथीदारांना त्यांनी लावलेल्या पत्त्यावर प्रत्येक वेळेस पैसे मिळत होते. त्यावेळी या शेतकऱ्यांच्या मनातही जुगारविषयी क्षणाक्षणाला उत्कंठा निर्माण होत होती. अशातच जुगार चौकडीतील या शेतकऱ्यावर लक्ष ठेवून असलेला शेतकरी त्या शेतकऱ्यास जुगारावर पैसे लावण्यास प्रोत्साहीत करीत होता. त्या व्यक्तीच्या प्रोत्साहनास बळी पडून संबंधित त्या शेतकऱ्याने सुद्धा जुगारात पैसे लावले. परंतु त्या शेतकऱ्यांचा जुगारातील ठाव प्रत्येक वेळी जुगार भरविणाऱ्याचा चालाखीपुढे प्रत्येक वेळी फसतच गेला. आपले पैसे पुढच्या डावावर निघेल या आशेवर हा शेतकरी पैसे संपेपर्यंत डब्बा जुगार खेळतच राहीला. सरतेशेवटी जनावरे विक्रीची पाच हजार रुपयांची संपूर्ण रक्कम या डब्बा जुगारात हरवून बसला व पडल्या चेहऱ्याने घराकडे परत गेला.
ही अवस्था बाजाराच्या दिवशी या जुगार खेळामुळे निश्चितपणे होत असल्याचे कळते. परंतु जुगार खेळलेला माणूस जुगार खेळणेही गुन्हा आहे या भीतीपोटी व आपण जुगारात हरलो हे सांगणे अपमानास्पद वाटत असल्यामुळे जुगारात लुबाडणाऱ्या जुगार चौकडीची साधी तक्रारही करीत नाही तसेच ही जुगार चौकडी जुगारात हरलेल्या व्यक्तीस त्यांच्याकडून तक्रार घेऊ नये, यासाठी त्याला दमही देतात. बाजार समिती परिसरातील एका सुज्ज्ञ इसमाने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जावून या जुगाराबद्दल माहिती दिली. परंतु पोलिसांनी सवयीप्रमाणे त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले.