लाखोंचा निधी पाण्यात : इमारत पडली धूळ खातसुमित हरकुट चांदूरबाजारसार्वजनिक बांधकाम विभाग चांदूरबाजार यांच्या अधिनस्त असलेले येथील विश्रामगृह मागील १० वर्षापासून भंगार अवस्थेत पडून आहे. विश्रामगृहाची आजची अवस्था पाहता विश्रामगृहाच्या बांधकामावर झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. या विश्रामगृहात कुठलीही सुविधा अद्यापही उपलब्ध न झाल्याने हे विश्रामगृह निरुपयोगी ठरले आहे. चांदूरबाजार-अमरावती मार्गावरील या विश्रामगृहाची सन २००३ मध्ये तत्कालिन राज्यमंत्री वसुधा देशमुख यांनी मुहूर्तमेढ रोवली होती. विश्रामगृहाकरिता त्यांनी स्वत:ची जमीन दान दिली होती. त्यामुळेच शहरात हे विश्रामगृह उभारले गेले. या विश्रामगृहात लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या मुक्कामासाठी सोय करण्यात आली होती. मात्र, या विश्रामगृहात आजवर विद्युत जोडणी, पाण्याची व्यवस्था, साफसफाई कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विश्रामगृहात आजवर कोणतेच लोकप्रतिनिधी व अधिकारी थांबू शकले नाहीत. १० वर्षानंतरही हे विश्रामगृह शोभेची वस्तू बनले आहे. या विश्रामगृहात सगळीकडे घाण व काटेरी झाडेझुडपे वाढली आहेत. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा भूमिपूजनाचा फलक देखील भंगार अवस्थेत पडलेला आहे. खिडक्यांची तावदाने तुटलेली आहेत. स्ट्रीट लाईट मोडलेल्या अवस्थेत आहेत. येथील भिंतीला जागोजागी तडे गेले असून विश्रामगृहाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. विश्रामगृहात सुविधा नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अमरावतीवरुन दररोज येणे-जाणे करावे लागते. शासनाची गाडी रोज अमरावतीला अधिकाऱ्यांची ने-आण करण्याकरिता जाते. त्यामुळे शासनाला अतिरिक्त आर्थिक भुुर्दंड तर होतोच पण अधिकाऱ्यांचे कामाचे तासही विनाकारण अप-डाऊनमध्ये खर्ची पडतात. त्यामुळे या विश्रामगृहाची दुरूस्ती व्हावी. लाखो रूपये खर्च करूनही विश्रामगृह हे सुरू करण्यात आले नाही. यामुळे लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची निवासाची गैरसोय होत असून अधिकारी अप-डाऊनसाठी शासकीय वाहनांचा वापर करीत आहेत. त्यामुळे हे विश्रामगृह तातडीने सुसज्ज करण्याची गरज आहे. - किशोर देशमुखनागरिक, चांदूरबाजार.
कुचकामी ठरले चांदूरबाजारचे विश्रामगृह
By admin | Updated: March 17, 2016 00:20 IST