चंद्रभागा पाणीपुरवठा योजना रखडली
By Admin | Updated: May 25, 2015 00:24 IST2015-05-25T00:24:22+5:302015-05-25T00:24:22+5:30
नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे केंद्र सरकार पुरस्कृत चंद्रभागा पाणीपुरवठा योजना रखडली आहे.

चंद्रभागा पाणीपुरवठा योजना रखडली
लोकप्रतिनिधींची उदासीनता : पालिका प्रशासनही सुस्त, नागरिकांचे हाल
सुनील देशपांडे अचलपूर
नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे केंद्र सरकार पुरस्कृत चंद्रभागा पाणीपुरवठा योजना रखडली आहे. अचलपूर परतवाड्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. मागील आठ वर्षांपासून ही योजना पूर्ण झाली नसून तीन मुख्याधिकारी आणि चार नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने या योजनेचे काम थंडबस्त्यात पडलेले आहे.
कोट्यवधी रूपये खर्च झाले, उर्वरित पैसेही खर्च होत आहेत, तरीही नागरिकांना चंद्रभागेचे पाणी मिळाले नाही. या योजनेतील गैरप्रकार, गैरव्यवहार वेळोवेळी चव्हाट्यावर येऊनही कुणावरही कारवाई झालेली नाही. योजना येतात, निधी येतो, पण जातो कुठे? हे कोडेच असून याला जबाबदार कोण, या प्रश्नाचे उत्तर कुणीच द्यायला तयार नाहीत.
अधिकारी व पदाधिकाऱ्यांची साधी चौकशीही झाली नाही. २००७ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सचिन देशमुख यांच्या कार्यकाळात ही योजना सुरू झाली. तत्कालीन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हस्तांतरित करावी, असे सांगितले असतानाही त्यावेळच्या नगरसेवकांनी याला विरोध करून ही योजना नगर पालिकेकडून सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आलेले मुख्याधिकारी गुणवंत वाहुरवाघ, श्रीकृष्ण भालसिंग तर सध्या कार्यरत मुख्याधिकारी धनंजय जावळीकर हेदेखील योजना पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यानंतरच्या कार्यकाळात झालेले नगराध्यक्ष लक्ष्मी वर्मा, सोनाली पाटील, अरूण वानखडे व विद्यमान नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी हेदेखील चंद्रभागेचे पाणी नागरिकांना देऊ शकले नाहीत.
जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री वसुधा देशमुख, नंतरचे सुनील देशमुख यांनीही या योजनेची चौकशी केली नाही. कंत्राटदारांनीही योजनेचे काम अपूर्णावस्थेत सोडले. तरीही कोट्यवधींची बिले काम न करताच काढल्याची चर्चा आहे. देवगाव येथील योजनेचा प्लांट व टाकलेल्या पाईपची दूरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मनमानी पद्धतीने पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनला बऱ्याच ठिकाणी गळती लागली आहे. कोट्यवधींचे बिडाचे नवीन पाईप धूळ खात पडून आहेत. काही ठिकाणी सांडपाणी वाहून नेण्यासाठी नागरिकांनी या पाईपचा उपयोग करून घेतला आहे.
परतवाड्यातील शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. ही टाकी येथे उभारू नये, म्हणून सुरूवातीपासूनच तेथील रहिवाशांचा विरोध होता. नगरपालिकेने मंजूर केलेल्या वॉर्डात पाण्याची टाकी न बांधता दुसऱ्या वॉर्डात बांधल्याने या वादाला तोंड फुटले. या योजनेसाठी पुन्हा ६.५ कोटी रूपये नगर परिषदेला प्राप्त झाले आहेत. गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी होत आहे.
माझ्या कार्यकाळात ही योजना आली. या कागदपत्रांची पूर्तता करण्यात दोन वर्षे निघून गेली. काहींनी हरकती घेतल्या. वॉटर फिल्टरसाठी माझ्या कार्यकाळातील उपाध्यक्ष विष्णू उपाध्याय यांनी जागा दान देण्याचे कबूल केले. नंतर शब्द फिरवला. या योजनेचे पाणी अचलपूर-परतवाड्यापर्यंत पोहोचले आहे. पण, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. पदाधिकाऱ्यांच्या अकोल्यातील साटेलोटेमुळे झालेल्या प्रकाराची कल्पना आली नाही. माझ्या कार्यकाळात झालेले योजनेचे काम पारदर्शी आहे.
- सचिन देशमुख, माजी नगराध्यक्ष.
ही योजना का रखडली यावर एक दिवस बोलणेही अपूर्ण ठरेल. अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे तत्कालीन नगरपालिकेच्या सदस्यांनी चुकीचेच निर्णय घेतले. कंत्राटदाराचाही स्वार्थ होताच. त्यामुळे चंद्रभागा योजनेचा बळी देण्यात आला.
- गजानन कोल्हे,
माजी नगरसेवक.
काही वेळा या योजनेविषयी तक्रारी झाल्या. कोर्ट मॅटर झाले. काही लोकांची उदासीनताही होती. तसेच याचा डीएसआर जुन्या दराचा होता. चालू दरामध्ये १८ कोटींचा फरक होता. शासनाने त्यातील ६ कोटी रुपये दिले. आम्ही या योजनेला गती दिली आहे.
- धनंजय जावळीकर,
मुख्याधिकारी, नगरपालिका.